‘किडनी रॅकेट’ टाळण्यासाठी...
By Admin | Published: July 24, 2016 02:52 AM2016-07-24T02:52:24+5:302016-07-24T02:52:24+5:30
नवीन तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचा वेग वाढला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता नवीन तंत्रज्ञान, औषधांमुळे सोप्या झाल्याने अनेकांना जीवनदान मिळत आहे.
- पूजा दामले
नवीन तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचा वेग वाढला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता नवीन तंत्रज्ञान, औषधांमुळे सोप्या झाल्याने अनेकांना जीवनदान मिळत आहे. या पूर्वी शरीरातील एखादा अवयव निकामी झाल्यावर औषधोपचार हा एकमेव पर्याय होता, पण आता मानवाच्या शरीरातला अवयव तो जिवंत असताना अथवा मृत झाल्यावर दुसऱ्याच्या शरीरात प्रत्यारोपित केला जातो. जीवनदान देणारे हे तंत्रज्ञान मात्र काळ््या धंद्यात अडकत आहे. अवयवाचा पैशात सौदा केला जातो. कायद्याची पायमल्ली करून जीवनदान मिळवण्याचे बेकायदेशीर प्रकार घडतात. मुंबईतल्या हिरानंदानी रुग्णालयत १४ जुलैला असाच एका किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला. दात्याने सेवाभावी वृत्तीने दान करणे अपेक्षित आहे, पण तसे होत नाही. हे रोखण्यासाठी सर्वांनी सजग राहणे आणि व्यवस्थेत पारदर्शकता येणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर दहा वर्षांपूर्वीपर्यंत शरीर किडनी स्वीकारण्याचा टक्का कमी होता. आता किडनी प्रत्यारोपण यशस्वी होण्याचे प्रमाण तब्बल ९५ टक्के आहे. किडनी निकामी झाल्यावर रुग्णासमोर दोन पर्याय असतात. डायलिसीस आणि प्रत्यारोपण हे ते प्रकार, पण त्यात प्रत्यारोपण हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे रुग्णाचे आयुर्मान तर वाढतेच. त्याचबरोबर, त्याचा आयुष्याचा दर्जाही सुधारतो, पण दात्यांची संख्या कमी असल्यामुळे आपल्याकडे डायलिसीसचा पर्याय निवडावा लागतो, पण डायलिसीस चांगल्या प्रकारे केल्यास ती व्यक्ती १० ते २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकते, असे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. श्रीरंग बिछू यांनी सांगितले.
बिछू यांच्या म्हणण्यानुसार, डायलिसीससाठी त्या व्यक्तीला आठवड्यातून ३ दिवस ४ तासांसाठी रुग्णालयात जावे लागते. परिणामी, त्याचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होते. किडनी प्रत्यारोपण झाल्यास पहिल्या वर्षी अधिक काळजी घ्यावी लागते. पहिल्या वर्षांत प्रत्येक महिन्यांत डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक असते. त्यानंतर मात्र, डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचे प्रमाण कमी होते. डायलिसीस मशीन आणि टेक्निशियन असला की, डायलिसीस चांगले होते असे नाही. चांगल्या प्रतीचे डायलिसीस झाल्यास रुग्णांची प्रकृती चांगली राहते. अनेकदा व्यक्ती दोन ते तीन वर्षे डायलिसीस घेतात. त्यानंतर, त्यांना किडनी मिळते, पण दोन ते तीन वर्षांत चांगले डायलिसीस न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावलेली असते. त्यामुळे त्यांचे प्रत्यारोपण होणे शक्य नसते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे डायलिसीस हा पर्याय नक्कीच उपयोगी ठरेल.
वैद्यकीय लेखक डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले, ‘परदेशात अवयवदात्याची सर्व माहिती ही आॅनलाइन उपलब्ध असते. त्याचप्रमाणे, ही माहिती सर्वांना उपलब्ध असते.’
आॅनलाइनमुळे प्रत्यारोपणात पारदर्शकता येत आहे. पारदर्शकता आणण्यासाठी आॅनलाइनचा वापर झाला पाहिजे. त्याचबरोबर, दात्यांची रजिस्ट्री तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्यानुसार, जवळचे नातेवाईक नसणाऱ्या व्यक्तीही अवयवदान करू शकतात, पण त्यामध्ये पैशाचा व्यवहार असू नये. दात्याने सेवाभावी वृत्तीने अवयव दान करणे अपेक्षित आहे, पण काही ठिकाणी या कलमाचा गैरफायदा घेतला जातो. यामुळे अनेकदा गैरमार्गाने परदेशी नागरिकांचेही प्रत्यारोपण होते. याला वैद्यकीय भाषेत ‘ट्रान्सप्लांट टुरिस्ट’ म्हटले जाते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा उभी राहणे आवश्यक असल्याचे अन्नदाते यांनी स्पष्ट केले.
अवयवदानासाठी १० जणांना नाकारले
कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार, जवळचे नातेवाईक सोडता अन्य कोणत्याही व्यक्तीला अवयव दान करायचे असल्यास, त्यांना वैद्यकीय आरोग्य शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून परवानगी घ्यावी लागते. गेल्या वर्षात १६० जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १५० जणांना परवानगी मिळाली, तर १० जणांना नाकारल्याचे संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.
कायद्यानुसार, पैशाचा व्यवहार न करता, मित्र-मैत्रिणी, चुलत-मामे भावंड, काका-काकू, मामा-मामी हे रुग्णाला अवयवदान करू शकतात. त्या आधी दात्याची चौकशी केली जाते. या दात्याकडून पॅनकार्ड, मतदार नोंदणी कार्ड, शाळेचा दाखला आणि अन्य कागदपत्रांची पडताळणी केली जाते. चार डॉक्टरांची समिती या दात्याची मुलाखत घेते. या मुलाखतीत अथवा कागदपत्रांमध्ये काही दोष आढळल्यास, त्या व्यक्तीला अवयवदान करण्याची परवानगी नाकारली जाते. गेल्या वर्षी १० जणांना याच कारणांमुळे परवानगी नाकारली गेली होती. तथापि, या लोकांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य नाही. कारण दोन मित्र अथवा अन्य दोन व्यक्तींमधील प्रेम आहे की नाही, हे सिद्ध करता येत नाही. माझ्या अनुमानानुसार, मी दात्याला अवयवदान करायचे की नाही याचा निर्णय देतो, पण त्यापुढे कायदेशीर कारवाई करणे शक्य नाही. संचालनालयाने परवानगी नाकारल्यास या व्यक्ती मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दाद मागू शकतात. वैयक्तिक अनुमानामुळे कायदेशीर कारवाई करणे शक्य नसल्याचे डॉ. शिनगारे यांनी सांगितले.
कशी होते दात्याची निवड?
किडनी हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. शरीराला शुद्ध रक्तपुरवठा होण्यासाठी किडनी गाळणीचे कार्य करत असते. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास त्या व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी त्या व्यक्तीसमोर डायलिसीस अथवा किडनी प्रत्यारोपण असे दोन पर्याय उपलब्ध असतात. किडनी प्रत्यारोपणासाठी जवळच्या नातेवाईकांना (आई-वडील, भाऊ-बहीण, बायको, मुले) प्राधान्य दिले जाते. त्यानंतर, चुलत भाऊ-बहीण, भाचा-भाची, मित्र-मैत्रीण यांचा विचार केला जातो.
प्रत्यारोपणासाठी रुग्ण आणि दाता या दोघांच्या तपासण्या केल्या जातात. रक्तगट आणि ‘ह्युमन ल्युकोसेट अँटीजन’ (एचएलए) ची तपासणी केली जाते. दात्याच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी केली जाते. त्यानंतर, दोन्ही किडनीची तपासणी केली जाते आणि दात्याला किडनीदान करण्याची परवानगी दिली जाते.
ही पथ्य पाळा...
- डायलिसीस आठवड्यातून तीनदा घेणे आवश्यक आहे. फक्त दोनदा डायलिसीस घेतल्यास त्याचा म्हणावा तितका परिणाम दिसून येत नाही.
- दर महिन्याला रक्त तपासणी करून घ्यावी
- मीठ कमी खावे, पाणी कमी प्यावे
- प्रोटिन जास्त प्रमाणात खावे
- हिमोग्लोबिनची इंजेक्शन घ्यावीत
- नियमित चालण्याचा व्यायाम करावा
- डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जावे
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे प्रमाण कमी-जास्त करावे