Join us  

मलेरिया रोखण्यासाठी ठेवा स्वच्छता

By admin | Published: April 25, 2016 3:27 AM

साठलेल्या पाण्यात मलेरियाच्या डासांची पैदास होते. त्यामुळे स्वच्छता न राखल्यास मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.

मुंबई : साठलेल्या पाण्यात मलेरियाच्या डासांची पैदास होते. त्यामुळे स्वच्छता न राखल्यास मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात महापालिका आणि सामान्य जनतेने एकत्र येऊन स्वच्छता ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मलेरियाचा प्रादुर्भाव होण्याचे मुख्य वाहक म्हणजे मलेरियाचे डास हे आहेत. मलेरियाला आळा घालायचा असल्यास वाहकांना (डास) आळा घालणे आवश्यक आहे. डासांची पैदास रोखल्यास मलेरिया होण्याचा धोका ८० ते ९० टक्क्यांनी कमी होतो. यासाठी धूम्रफवारणी वा अन्य उपायांपेक्षा स्वच्छता हा उत्तम उपाय असल्याचे मत केईएम रुग्णालयाचे जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. आर.आर. शिंदे यांनी व्यक्त केले. डॉ. शिंदे यांनी पुढे सांगितले, डासांचे आयुष्य तीन आठवड्यांचे असते. तर, मलेरियाचा जंतू शरीरात २१ दिवस जिवंत राहतो. मलेरियाचा असल्यास २१ दिवसांच्या आधीच निदान होते. मलेरियाचा डास फक्त अर्धा किलोमीटर उडू शकतो. त्यामुळे मलेरिया टाळण्यासाठी सर्वांनीच आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. डॉ. विनय अग्रवाल यांनी सांगितले, मलेरिया टाळण्यासाठी स्वच्छता राखणे हा उत्तम उपाय आहे. कारण देवी, कॉलरासारख्या आजारांवर लस उपलब्ध आहे; पण मलेरियाची लस करणे शक्य नाही. कारण, मलेरियाच्या रोगजंतूचे स्वरूप ४ वेळा बदलते. त्यामुळे मलेरियाची अन्य आजारांच्या लसीप्रमाणे लस देण्याबाबत अनेक वैज्ञानिक अडचणी आहेत. डासांचे सर्वसाधारण जीवनमान २० दिवसांचे असते. डास चावूनये यासाठी सर्वजण विविध कीटकनाशक स्प्रे, मलम व कॉईल्स वापरतात. मात्र, या औषधींच्या सान्निध्यात वाढलेल्या डासांच्या पुढील पिढीवर त्याचा काहीच परिणाम होत नसल्याने सर्व उपाय निष्फळ ठरतात. (प्रतिनिधी)> पाणीटंचाईमुळे सावधान!मलेरियांच्या डासांची पैदास ही स्वच्छ पाण्यात होते. सध्या पाणीटंचाई आहे. पावसाळ्यातही अनेकदा पाणी साठवून ठेवले जाते. त्यामुळे आठवड्यातून १ दिवस कोरडा पाळणे शक्य होत नाही. दीर्घकाळ पाणी साठवून ठेवल्याने मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. > मलेरिया टाळण्यासाठी हे आवश्यक! पाणी साठवून ठेवू नका, गोठे स्वच्छ ठेवा, गटारे झाका, घाणेरड्या पाणथळीवर वाढणाऱ्या अळ्यांचा आणि अंड्यांचा नाश करणे, खाचखळग्यात, खड्ड्यात साचलेले पाणी साफ करा