मुंबई : पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमधील चोरींच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकियेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. डिसेंबरपर्यंत राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे सूत्रांनी दिली.प्रवासी सुरक्षिततेसाठी रेल्वेमंत्र्यांनी महाव्यवस्थापकांना १८ महिन्यांसाठी सर्वाधिकार दिले आहेत. त्यानूसार पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रिमियम प्रकारातील एक्स्प्रेसमधील प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांकडूनही मोठ्या प्रमाणात याबाबत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. परिणामी पश्चिम रेल्वे प्रशासनासमोर चोरी रोखण्याचे आव्हान उभे आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही बसवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात या निविदा खुल्या करण्यात येणार आहेत.संबंधित ठेकेदाराला डिसेंबरपर्यंत राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मुदत देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यात सीसीटीव्ही फुटेज साठवून ठेवण्याची क्षमता असणार आहे. सध्याही एका राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रायोगिक तत्वावर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
चोरींच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:27 AM