लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मेनहोलचे झाकण उघडले जाताच किंवा पाणी ओव्हरफ्लो झाल्यास अलर्ट देणारा सायरन वाजणारी यंत्रणा मुंबईत १४ ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. त्यातील पहिल्या ठिकाणच्या म्हणजेच जी दक्षिण वॉर्डातील वरळी येथील बीडीडी चाळ येथील दोन ठिकाणी, तर बाळूशेठ मादुरकर मार्ग येथे एका ठिकाणच्या यंत्रणेसाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. झाकण चोरण्याचा किंवा उघडण्याचा प्रयत्न होताच सायरन वाजेल तसेच पाणी यातून ओव्हरफ्लो झाल्यासही अलर्ट देणारा सायरन वाजणार आहे. त्यामुळे चोरी पकडणे किंवा पाणी ओव्हरफ्लो झाल्यास त्वरित दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.
ज्या परिसरात यंत्रणा बसवली असून, ती ठिकाणेही नमूद आहेत. त्या-त्या परिसरात सायरन वाजताच मॅपवर पिवळी असलेली लाइट लाल होते. त्यामुळे लगेच अलर्ट मिळणार आहे.यामुळे मेनहोलची झाकणे चोरीला जाण्याच्या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
संरक्षक जाळ्यांसाठी प्रतिकृती तयार मुंबई महानगरात पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांचे मोठे जाळे आहे. सर्व मेनहोल्समध्ये मजबूत अशी संरक्षक जाळी बसवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या आणि त्या सोबतच संरक्षक जाळ्यांचा प्रोटोटाइप विकसित करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार यांत्रिकी आणि विद्युत विभागाने मेनहोलसाठी संरक्षक जाळ्यांची स्वतंत्र प्रतिकृती विकसित केली आहे. नवीन प्रोटोटाइपमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
सध्या विविध चाचण्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहरांत ही यंत्रणा बसवली असून, भायखळा येथे मलनिस्सारण विभागाच्या नियंत्रण कक्षाशी ती जोडण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात मुंबईचा मॅप आहे.
पालिकेला खडे बोल सुनावले आणि...
मुंबई उच्च न्यायालयाने मेनहोलसंदर्भात झालेल्या सुनावणीत उघडे मेनहोल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांचा मुद्दा मांडत मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर महापालिकेने मेनहोल झाकलेले असतील याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच मॅनहोलची झाकणे चोरीला जाऊ नये, यासाठी महापालिका यंत्रणेला सूचना देणारी सायरन यंत्रणा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. दरम्यान, जी दक्षिण विभागातील मेनहोलसाठी पालिकेने निविदा काढली असून, त्याला प्रतिसाद मिळाल्यास लवकरच ही यंत्रणा कार्यन्वित होणार आहे.