मुंबई : मुंबईत पावसामध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, शहर आणि उपनगरांतील ४८१ ठिकाणी उपसा करणारे पंप बसविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये शहरात १८७, पश्चिम उपनगरांमध्ये १६६ आणि पूर्व उपनगरांमध्ये १२४ पंप बसविण्यात येणार आहेत. हे पंप उच्च कार्यक्षमतेचे आणि आपत्कालीन परिस्थितीत कायम कार्यरत राहणार आहेत. या पंपांचे काम पाहण्यासाठी आणि त्या परिसरातील स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती केली जाणार आहे. वॉर्डातील सहायक अभियंते हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. पुढील २ वर्षांसाठी पालिकेकडून या भाडेतत्त्वावरील पंपांची व्यवस्था केली जाणार असून, यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पूरप्रवण किंवा पाणी जमा होणाऱ्या सखल भागात पंप वेळेत सुरू करणे, आवश्यकता न नसल्यास तो बंद करणे, योग्य पद्धतीने कार्यरत आहे की नाही तसेच पाणी उपसा झाल्यानंतर त्या भागातील स्वच्छता करणे या जबाबदाऱ्या संबंधित व्यक्तींवर असतील.
समन्वय अधिकारी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील समन्वयकाकडे या पंपांच्या कामगिरीची माहिती वेळोवेळी देणार आहेत. त्यामुळे जोरदार पावसावेळी पंपांनी किती तास पाणी उपसा केला, यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
...असे आहे नियोजन
१) पालिकेकडून २०२२ मध्ये ३८० पंप बसविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, विभागांच्या मागणीनुसार ५५ अतिरिक्त म्हणजेच एकूण ४३५ पंप बसविण्यात आले होते.
२) २०२३ मध्येदेखील पाणी उपसा करणारे ३८० पंप बसविण्याचे नियोजन केले होते. वाढीव मागणीनंतर ११२ अतिरिक्त पंपांसह एकूण ४९२ पंप कार्यान्वित होते. ३) २०२४मध्ये २५ प्रशासकीय विभाग आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय, लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाच्या मागणीनुसार ४८१ पंप बसविण्याचे नियोजन पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केले आहे.
१०१ पूरप्रवण क्षेत्रांचे आव्हान :
पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येतात. तरीही फ्लडिंग पॉइंटची (पूरप्रवण क्षेत्र) नव्याने निर्मिती पालिकेसाठी डोकेदुखी ठरते. मुंबईत ठिकठिकाणी तब्बल ३८६ फ्लडिंग पॉइंट आढळतात. पालिकेने तातडीने उपाययोजना केल्या. ३८६ ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी नव्याने १०१ पूरप्रवण क्षेत्रांची निर्मिती झाल्याने पावसाळ्यापूर्वी हे भाग पूरमुक्त करणे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.
पाणी तुंबण्याच्या ठिकाणात घट पण...
पर्जन्य जलविभागाने यंदा वाहिनीची स्वच्छता, अंथरलेल्या नवीन पर्जन्य जलवाहिन्या, खराब झालेल्या वाहिन्यांचे मजबुतीकरण यामुळे काही सखल परिसरात पाणी साचण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. पावसाळ्यातील परिस्थितीनुसार पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढही होऊ शकते, या दृष्टीने महानगरपालिकेने नियोजन केले आहे.