Join us  

हृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखता येणार; केईएम रुग्णालयात लवकरच स्टेमी प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 12:14 PM

येत्या दोन ते तीन आठवड्यांत केईएम रुग्णालयात हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली आहे.

मुंबई : हृदयविकारांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आता पालिकेचे केईएम रुग्णालय सज्ज झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रथमच स्टेमी केअर प्रकल्प प्रायोगिक पातळीवर राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडे या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सहा तासांच्या आत औषधोपचार करून मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे ओळखण्यासह लवकर उपचार करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यात रुग्णालयातील उपचार केंद्रांमध्ये हृदयरोगतज्ज्ञांचे चमू उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून निदान आणि उपचार यांच्यासाठी लागणारा कालावधी कमी केला जातो व त्यातून जीव वाचविणे अधिक सुकर होते.

येत्या दोन ते तीन आठवड्यांत केईएम रुग्णालयात हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली आहे. हा प्रकल्प ह्रदयविकारांनी ग्रस्त असणाऱ्या किंवा हृदयाचा झटका आलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल. या प्रकल्पाचा पालिकेवर अधिक आर्थिक भार न पाडता सध्या उपलब्ध संसाधनांचा वापर करता येणार आहे.

स्पोक, हबची रचना

या प्रकल्पामध्ये’स्पोक’व’हब’हे मॉडेल वापरण्यात येणार आहे.’स्पोक’मध्ये स्थानिक रुग्णालय, आरोग्य केंद्रांचा समावेश असून त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी अतितत्काळ सेवा दिल्या जाणार आहेत. विशेष विभागात त्याठिकाणी ईसीजी यंत्र लावण्यात येईल. तेथे ईसीजी तंत्रज्ञ असेल. याठिकाणी रुग्ण आल्यावर त्याचा ईसीजी काढला जाईल आणि तो माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने क्लाऊड कनेक्टिव्हीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडे पाठविला जाईल. तज्ज्ञांद्वारे औषधोपचाराबाबत दहा मिनिटांच्या आत मार्गदर्शन केले जाईल.

स्पोकमध्ये रुग्णांचा ईसीजी करून हृदयविकाराचा झटका आला की नाही, याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाईल. ‘हब’मध्ये हृदयरोग तज्ज्ञ आणि हृदय शस्त्रक्रिया करण्याची सोय असलेल्या मोठ्या शासकीय व  खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. 

मृत्यूदर घटण्यास उपयुक्त 

स्टेम प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराची सुविधा मिळणार आहे. परिणामी, या आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश येईल. कोरोनरी आर्टरी आजारामुळे तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदयरोग होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात (गोल्डन अवर) मध्ये औषधोपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट’स्टेमी’प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. - प्रा. डॉ. चरण लांजेवार, डी. एम. कार्डिओलॉजी विभागाचे युनिटप्रमुख

टॅग्स :हॉस्पिटलहृदयविकाराचा झटका