बुरखाधारी मुलींना रोखले; चेंबूरच्या कॉलेजात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2023 03:58 PM2023-08-03T15:58:29+5:302023-08-03T15:58:54+5:30
...हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई : चेंबूर येथील आचार्य कॉलेजमध्ये बुरखाधारी विद्यार्थिनींना रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. मुस्लीम तरुणींना कॉलेजच्या आवारात बुरखा घालून जाण्यापासून रोखण्यात आले. त्यावरून महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींनी या घटनेचा निषेध केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालय आवारात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर गोंधळ उडाला. मुलींनी महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाचा जोरदार निषेध नोंदवला. हा व्हिडीओ बुधवारी पोस्ट केला आहे. महाविद्यालयाने आम्हाला गणवेश घालण्यासाठी एक जागा निश्चित करून द्यावी, अशी विद्यार्थिनींची मागणी आहे तर विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या बाहेरुनच गणवेश घालून यावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विद्यार्थी संघटनांनी यावर आक्रमक भूमिका मांडली आहे.
भूमिका अस्पष्ट
आचार्य आणि मराठे महाविद्यालयात युनिफॉर्म कोड लागू आहे. युनिफॉर्म सर्वांना बंधनकारक आहे. मात्र, कॉलेज सुरू झाल्यावर ज्यांनी युनिफॉर्म घेतलेला नाही, त्यांच्यासाठी काही दिवस ही अट शिथिल असते. मुस्लीम विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आल्यानंतर अनेक वर्षांपासून आणि नवीन विद्यार्थी आपला बुरखा बदलून कॉलेजचा युनिफॉर्म घालतात. मात्र, कॉलेज प्रशासनाने आता बुरखा हा बाहेरच काढून या, असा नवीन फतवा काढल्याचा आरोप बुरखा घालणाऱ्या विद्यार्थिनींसह पालकांचा आणि काही विद्यार्थी संघटनांचा आहे. कॉलेज प्रशासनाने मात्र यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
नसीम खान यांचे पत्र
नियमबाह्य ड्रेस कोडचा निर्णय लादणाऱ्या आचार्य महाविद्यालयावर त्वरित कार्यवाही करण्याचे मागणी करणारे पत्र महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना लिहिले आहे.