मुंबई : महापालिका शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या बालवाड्यांची संख्या कमी असल्याने मुले खासगी बालवाड्यांकडे वळतात. परिणामी मनपा शाळांच्या प्रवेशावर याचा परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन सध्याच्या ५०४ बालवाड्यांव्यतिरिक्त तब्बल ३९६ बालवाड्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार प्रक्रियेअंती २२ संस्थांना नेमणूकपत्रे देण्यात आली़ प्रत्येकी ३० पट-क्षमता असणाऱ्या बालवाड्यांमुळे पालिकेच्या बालवाड्यांची संख्या ९०० होईल. परिणामी महापालिकेच्या बालवाड्यांची एकूण पट-क्षमता २७ हजार होईल. या बालवाड्यांमुळे विद्यार्थी गळती रोखण्यास मदत होईल.नव्या ३९६ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १३३ बालवाड्या मराठीच्या आहेत. त्याखालोखाल ९२ बालवाड्या उर्दूच्या, ८७ हिंदीच्या, २५ गुजराती माध्यमाच्या, २३ इंग्रजी माध्यमाच्या आहेत. याखालोखाल कन्नड व तेलगू भाषिक प्रत्येकी १०; तर तामिळ माध्यमाच्या ९ बालवाड्या आहेत. याव्यतिरिक्त ६ सेमी इंग्रजीच्या असणार असून १ बालवाडी ही मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत असणार आहे. नव्या ३९६ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४४ बालवाड्या एफ उत्तर विभागात आहेत. एफ उत्तर विभागातील बालवाड्यांची एकूण संख्या ७६ होईल. याखालोखाल एच पूर्व विभागात ३८ बालवाड्या सुरू होतील. एच पूर्व विभागातील बालवाड्यांची संख्या ६० होईल. पी उत्तर विभागात ३५ नव्या होतील. त्यामुळे येथील बालवाड्यांची संख्या ५५ होईल. बी व सी या दोन विभागांत यापूर्वी पालिकेच्या बालवाड्या नव्हत्या. आता दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे ५ व १२; याप्रमाणे एकूण १७ बालवाड्या पहिल्यांदा सुरू होतील.मराठीच्या सर्वाधिक बालवाड्या !आधीपासून सुरू असलेल्या ५०४ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १९० बालवाड्या मराठीच्या आहेत. ११४ हिंदीच्या, १०७ उर्दूच्या, ६६ इंग्रजीच्या, १० तामिळ माध्यमाच्या आहेत. याखालोखाल गुजराती माध्यमाच्या ९, सेमी इंग्रजी ६, तर कन्नड व तेलगू माध्यमाची प्रत्येकी १ बालवाडी सध्या कार्यरत आहे. या सर्व कार्यरत बालवाड्यांची पट-क्षमता १५ हजार १२० आहे. सर्वाधिक म्हणजे ८६ बालवाड्या एल विभागात आहेत. नवीन प्रस्तावानुसार या विभागात आणखी २५ बालवाड्या सुरू होतील. त्यामुळे विभागातील बालवाड्यांची संख्या १११ होईल. यामध्ये १० इंग्रजी, १ गुजराती, हिंदी २६ (नवीन ३ सह), ३३ मराठी (नवीन १६ सह), सेमी इंग्रजी २, उर्दू ३९ (नवीन ३ सह); अशा सहा भाषिक बालवाड्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास ३९६ बालवाड्या सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 4:37 AM