सांडपाण्याच्या प्रदूषणास बायोरेमेडिएशनमुळे आळा; प्रक्रिया करून पाणी प्रवाहात सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:59 AM2024-02-29T09:59:26+5:302024-02-29T10:02:27+5:30

मलनिःसारण वाहिन्यांतून निघणाऱ्या सांडपाण्यावर बायोरेमेडिएशन तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे.

prevention of waste water pollution through bioremediation the water will be treated and released into the stream | सांडपाण्याच्या प्रदूषणास बायोरेमेडिएशनमुळे आळा; प्रक्रिया करून पाणी प्रवाहात सोडणार

सांडपाण्याच्या प्रदूषणास बायोरेमेडिएशनमुळे आळा; प्रक्रिया करून पाणी प्रवाहात सोडणार

मुंबई : मलनिःसारण वाहिन्यांतून निघणाऱ्या सांडपाण्यावर बायोरेमेडिएशन तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे सांडपाणी थेट समुद्रात जाऊन होणाऱ्या प्रदूषणास आळा बसण्यास मदत होणार आहे. मलनिःसारण प्रचालन विभागाकडून ही यंत्रणा उभारण्यात येणार असून यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.

हरित लवादाने मलनिःसारण वाहिन्यांतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच हे प्रदूषण रोखण्यासाठी लवादाने उपाययोजना राबविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानंतर पालिकेने हरित लवादाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार घाटकोपर, भांडूप, वर्सोवा आणि मालाड या प्रक्रिया केंद्रामध्ये सांडपाण्यावर बायोरिमेडिएशन तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुंबई मलनिःसारण प्रकल्प विभागाने सुरू केलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या पुनर्रचनेची कामे कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून लव्हग्रोव्ह, वरळी आणि वांद्रे सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथील मलजलावर बायोरेमेडिएशन तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याची कामे प्रस्तावित आहेत.मलवाहिन्यांमध्ये एखाद्या कामगाराने प्रवेश केल्यास अथवा मलवाहिन्यांमधील मलजल पातळी जाणून घ्यायची असल्यास ती स्मार्ट मॅनहोल प्रणालीमुळे कळणार आहे. 

जीर्ण मल वाहिन्यांची पुनर्बांधणी :

मुंबई शहर आणि उपनगरातील जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या सुमारे ८२ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्यांच्या पुनर्बांधणीची कामे चरविरहित तंत्रज्ञानाने टप्याटप्याने करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केली जाणार.

उदंचन केंद्रांची क्षमता वाढवणार :

मलनिःसारण प्रचालन विभागातील सर्व उदंचन केंद्रांची कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे. यामुळे ऊर्जाबचत, उदंचन केंद्रांच्या कार्यक्षमतेत वाढ व विविध मलजल यंत्रे व संयंत्रे यांच्या आयुर्मानात वाढण्यास मदत होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच मलनिःसारण प्रचालन विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाज ५५७ कोटीइतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

बायोरेमेडिएशन म्हणजे काय?

१) बायोरिमेडिएशन या प्रक्रियेत प्रदूषित सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी सूक्ष्मजीव, वनस्पती यांचा वापर करून दूषित घटकांचे विघटन केले जाते. 

२) प्रदूषित घटक नष्ट करण्यासाठी या जैविक घटकांचा वापर केला जातो. बायोरिमेडिएशन प्रक्रिया ही संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. 

३) विशिष्ट सूक्ष्म जंतूंचा वापर केला जातो. यात ते अन्न आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून दूषित पदार्थ वापरता. त्यामुळे या दूषित पदार्थाचे प्रमाण कमी होते.

Web Title: prevention of waste water pollution through bioremediation the water will be treated and released into the stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.