मुंबई : विशेष मूल असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या बदलीच्या आदेशाला उच्च न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर नव्या पदावर रुजू न झाल्याने सरकारने त्याला बजावलेल्या नोटीसलाही न्यायालयाने स्थगिती दिली. महाराष्ट्र असोसिएशन आॅफ कल्टिवेशन आॅफ सायन्स या विभागात चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या मुरलीधर गुरव यांना माळी या पदावरून सहायक म्हणून बढती देण्यात आली. ६ जून २०१४ रोजी गुरव यांना दिलेल्या यासंबंधीच्या पत्रात पुणे शहरातून बारामती तालुक्यातील होळ गावात त्यांना रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. मात्र गुरव यांनी बारामतीला जाण्यास नकार देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.आपला मुलगा ५० टक्के गतिमंद असल्याने त्याला आवश्यक असलेल्या सुविधा राहत्या घराजवळ उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुलाचा काळजीवाहू म्हणून सरकारच्या या ‘बदली’ पद्धतीतून वगळण्यात यावे, असे गुरव यांनी याचिकेत म्हटले आहे. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न झाल्याने सरकारने खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. तसेच ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.‘स्वीकृतदर्शनी याचिकाकर्त्याच्या समर्थनार्थ आम्ही सरकारने बजावलेली नोटीस आणि याचिकाकर्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देत आहोत,’ असे म्हणत खंडपीठाने महाराष्ट्र ओससिएशन फॉर कल्टिवेशन आॅफ सायन्स व अन्य प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
विशेष मुलाच्या वडिलांच्या बदलीला स्थगिती
By admin | Published: November 15, 2016 6:04 AM