मुंबई : सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिझेलचे दर सध्या देशभरात चर्चेचा प्रमुख मुद्दा बनला आहे. त्यात भाजीपाल्याने महागाईचे शिखर गाठल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मिरची शंभरीपार पोहोचली असून, इतर भाज्यांचे दरही वधारले आहेत. वांगी, भेंडी, गवार आणि फ्लॉवरमध्ये १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. दैनंदिन आहारात समावेश असलेल्या भाज्या महागल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहेत. अवकाळी पावसासह इंधन दरवाढ हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे इंधन दर आटोक्यात आणण्याची मागणी व्यापाऱ्यांसह ग्राहकांकडूनही केली जात आहे.
भाजीपाला का महागला? गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होऊन बाजारातील आवक घटली आहे.पेट्रोल - डिझेलचे दर वाढत असल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. शिवारापासून बाजार समिती आणि पुढे मंडईपर्यंत शेतमाल पोहोचेपर्यंत या दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत.
भाज्या महागल्या की बजेटवर सर्वाधिक परिणाम होतो. आधी आम्हाला दोन ते अडीच हजारांच्या भाज्या लागायच्या. आता साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत.- सुशीला रेडकर, गृहिणी
पेट्रोल-डिझेल जोपर्यंत स्वस्त होत नाही, तोपर्यंत भाज्या स्वस्त होणार नाही. इतकी भाववाढ होऊनही बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात कवडीमोल दरच पडणार आहेत. यात दलालांची चांदी आहे. याकडेही लक्ष द्यायला हवे.- भावना देसाई, गृहिणी
भाजीपाला दर (प्रतिकिलो)
मिरची १२० वांगी ८० भेंडी ८० गवार ८० फ्लॉवर ७० कोबी ६० कारले ६० गाजर ७०
पेट्रोल, डिझेलचे दर असे...कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना सातत्याने वाढणारे इंधन दर महागाईत तेल ओतत आहेत. पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतर डिझेलही त्या टप्प्यावर आले आहे. सध्या मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपयांनी मिळत असून, डिझेलचे दर ९४.१४ रुपयांवर पोहोचले आहेत.