लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदाच्या हंगामात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात भुईमुगाच्या लागवडीत घट झाली. त्यामुळे शेंगदाण्याच्या भावात घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचा भाव प्रतवारीनुसार १९९ ते २४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर तेल प्रतिलिटर २४० वरून पुढे ३०० रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जेवणातून शेंगदाणा तेल गायब होणार की काय, अशी चिंता विशेषतः गृहिणींना सतावत आहे.
हवामान बदल, पाऊसही रेंगाळला !
गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर शेंगदाणा निर्यात केला जातो, तर भुईमूग उत्पादक असलेल्या राज्यात हवामानातील बदल आणि जास्त काळ रेंगाळलेला पाऊस हेही एक कारण आहे. त्यामुळे भुईमूग लागवड क्षेत्रात घट झाली आणि तेल कंपन्यांनी त्याची मागणी वाढविली आहे. या सगळ्या गोष्टी शेंगदाण्याचे भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे.लहानपणापासूनच तेलामध्ये खरपूस भाजलेला मसाला जेवणात वापरण्याची सवय आम्हाला आहे. मुख्य म्हणजे शेंगदाणा तेलाचा वापर आमचे अख्खे कुटुंब करते. मात्र तेलाचा दर असाच वाढला, तर चमचमीतपणा कमी करावा लागेल असे वाटते. - रूपाली कांबळे, गृहिणी.
कोरोनानंतर शक्यतो आम्ही कमी तेलाचे, कमी मिठाचे आणि कमी साखरेचे जेवण सुरू केले आहे. कामाच्या व्यापात व्यायाम शक्य होत नाही, त्यामुळे बऱ्याचदा झिरो ऑइल जेवणावर आमचा फोकस असतो. शक्यतो फळ आणि भाज्यांचा वापर जेवणात आम्ही करतो. - मानसी चिंदरकर, योगा प्रशिक्षक.
...म्हणून तेलाची किंमत वाढणार
बाजारात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातून दररोज १०० ते १५० गाड्या शेंगदाण्याची आवक होते. राजस्थान, गुजरातमधील शेंगदाणा संकरित (हायब्रीड) आहे. बाजारात पुढील काही दिवसांत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू येथून शेंगदाण्याची आवक सुरू होईल. मात्र, ही राज्ये दक्षिण भारतातच मोठ्या प्रमाणात शेंगदाणा पाठवितात. त्यामुळे महाराष्ट्रात अधिक प्रमाणात आवक होत नाही. शेंगदाण्याला तेलनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मागणी असून, शेंगदाणा तेलाचा वापर वाढलेला आहे. यामुळे शेंगाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने तेलाची किंमत वाढत जाणार आहे. - नरेंद्र विश्वकर्मा, तेल व्यापारी.