Join us

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

मुंबई : देशात यंदा साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असल्याने साखरेचे भाव काही प्रमाणात नियंत्रणात आहेत. असे असले तरी गुळाचे ...

मुंबई : देशात यंदा साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असल्याने साखरेचे भाव काही प्रमाणात नियंत्रणात आहेत. असे असले तरी गुळाचे भाव मात्र वाढतच आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींना महागाईचा सामना करावा लागत आहे. उत्पन्न वाढल्याने आता घाऊक बाजारात साखरेचे भाव उतरले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातदेखील साखर ४० ते ४२ रुपये किलो दराने विकली जात आहे. मात्र गुळाचे भाव वाढल्याने आता गूळ ५० ते ५२ रुपये किलो या दराने विकला जात आहे.

पूर्वी साखर हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे आणि गूळ खाणे म्हणजे गरिबीचे लक्षण मानले जायचे. मात्र आता मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर केला जात आहे. अनेक कुटुंबांमध्ये गूळ हे डाएट फ्रेंडली मानले जात आहे. त्यामुळे चहा गोड-धोड पदार्थ बनविण्यासाठी गुळाच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. मात्र साखरेपेक्षा गुळाचे भाव वाढत असल्याने सामान्य माणसाला काही प्रमाणात महागाईची झळ सोसावी लागत आहे.

असा वाढला गुळाचा भाव

साखर. गूळ

२००० ८. १३

२००५. १०. १५

२०१०. १८. २२

२०२०. ३८. ४८

२०२१. ४२. ५२

गुळाचा चहा बनले स्टेटस

पूर्वी साखर हे श्रीमंतीचे लक्षण तर गुळाचा चहा गरिबीचे लक्षण मानले जायचे. मात्र आता गूळ आरोग्यासाठी चांगला असल्याने अनेक जण गोड पदर्थांसाठी गुळाचा वापर करत आहेत. अनेक चहाच्या दुकानांमध्येदेखील गुळाचा चहा हा वाढीव दराने विकला जात आहे. त्यामुळे गुळाचा चहा आता चहाप्रेमींसाठी श्रीमंतीचे लक्षण मानले जात आहे.

प्रकृतीसाठी गूळ चांगला

(समीर देसले, आहारतज्ज्ञ) - गूळ अनेक पोटाच्या विकारांसाठी अत्यंत लाभदायक आहे. सध्या पावसाळ्याच्या काळात सर्दी-खोकला यांसारख्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढते. यामुळे गुळात आले, काळी मिरी मिसळून खाल्ल्यास साथीच्या रोगांपासून बचाव होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाणदेखील नियंत्रणात राहते.

शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी

प्रेमदास शेरे - कोरोनामुळे मागील दोन वर्षांत साखरेपेक्षा गुळाला मागणी वाढली आहे. साखरेपेक्षा गूळ हा आरोग्यासाठी चांगला मानला जात असल्याने अनेक जण गूळ खाण्यास प्राधान्य देत आहेत.

गावात मात्र साखरच

संतोष धस - गावाकडच्या लोकांना दररोज शेतात काम करावे लागते. त्यात मेहनत जास्त असते. त्यामुळे त्यांच्यात आजाराचे प्रमाण कमी असते. काम करण्यासाठी सतत शक्ती लागते. यासाठी शरीरात साखरेचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. त्यामुळे खेड्यापाड्यात साखर खाल्ली जाते.