Join us

लसणाचे दर ४०० पार, देशी लसूण झाला दुर्मीळ; सर्वसामान्यांचे बिघडले घरचे बजेट  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:39 AM

भाजीच्या चवीसाठी असलेल्या लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसणाचे भाव गगनाला पोहोचले आहेत.

मुंबई : भाजीच्या चवीसाठी असलेल्या लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसणाचे भाव गगनाला पोहोचले आहेत. सध्या बाजारात लसूण प्रतिकिलो २०० ते ३०० रुपये तर देशी लसूण चारशे रुपयांवर पोहोचल्यामुळे ग्राहकांना अधिकचा भार सहन करावा लागत आहे. गावरान लसूण तर चारशेच्या पार गेल्याने ग्राहकांना परवडेना अशी स्थिती आहे. हिवाळ्यात कांद्यापाठोपाठ आता लसणाचे भाव भडकले आहेत. त्यामुळे लोकांचे घरचे बजेट बिघडले आहे.

टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले होते. त्यातच आता लसणाला महागाईची फोडणी मिळाली आहे. लसणाचा दरही ४०० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. अनेक शहरांमध्ये लसणाची किंमत ४०० रुपये प्रतिकिलोच्या जवळ पोहोचली आहे. 

का वाढले भाव? 

 डाळी, तांदूळ आणि कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे आधीच लोकांचे घरचे बजेट बिघडले आहे.

 गेल्या काही काळात कांद्याच्या दरात घसरण झाली होती, मात्र आता लसणाच्या भावात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे घरचे बजेट बिघडत आहे. 

 लसणाच्या किमती वाढण्यामागे दोन कारणे आहेत. प्रथमत: यंदा खराब हवामानामुळे लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोठून होते आवक?

मध्य प्रदेश व गुजरातमधून लसणाची आवक होते. देशात सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेशमध्ये होते. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा परिसरात लसणाचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटकातून लसणाची आवक होत असल्याची माहिती मिळाली आहे. आवक कमी होत असल्याने भावदेखील वाढले आहेत.

दिवाळीपूर्वी तीस ते चाळीस रुपये किलो असलेला लसूण आता अडीचशेच्या घरात पोहोचला आहे. देशी लसूण विक्रीसाठी येण्यास दोन महिन्यांचा अवधी असल्याने या महागाईत आणखी भर पडली आहे. संकरित लसणासाठी किलोला अडीचशे ते तीनशे रुपये तर देशी लसणासाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत. फेब्रुवारीअखेरपर्यंत लसणाचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. - इब्राहिम बागवान, लसणाचे व्यापारी  

गरजे पुरती लागवड :

देशी लसणाचे उत्पादन प्रामुख्याने स्थानिक व कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी परिसरात होते. याची लागवड कुडी लावून केली जाते व मशागतीसाठी मानवी श्रमांची गरज असते. शिवाय हा लसूण वर्षभरच टिकतो.  त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबाची गरज भागविण्यापुरतीच त्याची लागवड करतात.

टॅग्स :मुंबई