Join us

‘मरे’ व ‘परे’च्या सरकत्या जिन्यांवरील किमतीत तफावत

By admin | Published: May 16, 2017 1:11 AM

मुंबईकरांची ‘लाइफलाइन’ असलेल्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधांसाठी सरकते जिने (एस्क्लेटर) बसवण्यात आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांची ‘लाइफलाइन’ असलेल्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधांसाठी सरकते जिने (एस्क्लेटर) बसवण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोजलेल्या किमतीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम रेल्वेला एका स्थानकार ही यंत्रणा बसविण्यासाठी ७२ लाख २८ हजार खर्च आला असताना मध्य रेल्वेने मात्र त्यासाठी सरासरी ७६ लाख ९६ हजार रुपये मोजले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यातून मिळविलेल्या माहितीतून ही दरातील तफावत समोर आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे सरकते जिने आणि त्यांवर होणाऱ्या खर्चाबाबतची माहिती गलगली यांनी मागविली होती. त्याबाबत ‘मरे’च्या उपप्रमुख अभियंता नीरज कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मरेच्या १४ रेल्वे स्थानकांवर २० सरकते जिने बसविण्यात आले आहेत. त्यासाठी ११ कोटी ९० लाख ६० हजार ३८८ रुपये खर्च आला आहे. त्यामध्ये दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवरील ८ जिन्यांसाठी ४.३५ कोटी तर उल्हासनगर, भांडुप, विद्याविहार येथील ४ जिन्यांसाठी ३ कोटी ९ लाख ९३ हजार ७५० रुपये खर्च झाले आहेत. कांजूरमार्ग स्थानकात सरकत्या जिन्यासाठी ७६ लाख ९६ हजार रुपये आणि मुलुंड स्थानकात ७७ लाख ४५ हजार ३०९ रुपये खर्च करण्यात आले आहेत. नागपूर स्थानकात बसवण्यात आलेल्या दोन सरकत्या जिन्यांसाठी प्रत्येकी ५४ लाख ६६ हजार ४५० रुपये खर्च करण्यात आले आहेत.पश्चिम रेल्वेच्या १३ स्थानकांवर ३४ सरकत्या जिन्यांसाठी प्रत्येकी ७२ लाख २८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामध्ये अंधेरी स्थानकात ७, भार्इंदरसह विलेपार्ले, नालासोपारा कांदिवली येथे प्रत्येकी १, दादर स्थानकावर २, गोरेगाव ६ आणि वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम आणि अहमदाबाद या स्थानकांवर प्रत्येकी २ असे एकूण ३४ सरकते जिने बसवण्यात आले आहेत.