अनन्याचे ‘लोकमत’कडून कौतुक
By admin | Published: May 22, 2015 10:47 PM2015-05-22T22:47:15+5:302015-05-22T22:47:15+5:30
आयसीएसई परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावणाऱ्या अनन्या पटवर्धन हिचे गुरुवारी ‘लोकमत’कडून कौतुक करण्यात आले.
मुंबई : आयसीएसई परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावणाऱ्या अनन्या पटवर्धन हिचे गुरुवारी ‘लोकमत’कडून कौतुक करण्यात आले. या वेळी आपल्या करिअरविषयी बोलताना अनन्याने विधी शाखेमध्ये करिअर करण्याचा निर्धार बोलून दाखवला. आई-वडील इंजिनीअरिंग क्षेत्रात असतानाही तिने करिअरची वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीएसई दहावी परीक्षेत ९९.२0 गुण मिळवत अन्यया आणि आणखी दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबद्दल मुंबईतील अन्यया पटवर्धन हिचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. या परीक्षेत सुमारे ९६ ते ९७ टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु निकालात मिळालेले गुण आश्चर्यकारक होते. मी अभ्यास करताना मध्ये ब्रेक घेत होते. इतर मुले अभ्यास सलगपणे केला पाहिजे, असा समज ठेवतात. त्यामुळे अधिक प्रेशर येते. ब्रेक घेतल्यास माइंड फ्रेश राहते, असा सल्लाही तिने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
अभ्यास करताना गेल्या १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. तसेच आजी, आई आणि वडिलांनी अभ्यासासाठी मार्गदर्शन केल्याने हे यश मिळवता आल्याचे तिने नमूद केले. दिवसातून ५ ते ६ तास अभ्यास करीत असे. इतर नोट्सचा आधार घेण्याऐवजी क्रमिक पुस्तके वाचण्यावर भर दिला. परीक्षेच्या काळात तणाव येऊ नये, यासाठी प्रथम सत्रापासून मेडिटेशनही करीत असे. यासह शाळेत आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धांमध्येही सहभाग घेत असल्याचेही अनन्याने सांगितले. शाळेतील परीक्षांदरम्यान मी शाळेतून पहिली येईन, असे शिक्षकांना वाटत होते. परंतु इतके मोठे यश मिळेल याची आशा नव्हती, असेही ती म्हणाली. अभ्यासासह म्युझिक, वाचनाची आवड जोपासली. क्लासिकल म्युझिकच्या चार परीक्षा दिल्याचेही तिने सांगितले.
मी एसएससी बोर्डातून दहावी झालो आहे. परंतु एसएससी बोर्ड आणि आयसीएसई बोर्डामध्ये बराच फरक आहे. उच्च दर्जाचे इंग्रजी, प्रोजेक्ट वर्क अशा अनेक गोष्टींमुळे अनन्यासाठी मी आयसीएसई बोर्ड निवडले, असे तिचे वडील हर्षद पटवर्धन यांनी सांगितले.
‘लोकमत’ परिवारातील नयनिका तापश दासने दहावीच्या परीक्षेत ९५.५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी नयनिकाला पुच्छगुच्छ देऊन तिचे कौतुक केले. नयनिकाने दुसरीत शिकत असल्यापासून डॉक्टर होण्याचे ठरवले आहे. त्या दिशेने तिने टाकलेले हे यशस्वी पाऊल आहे.
नयनिका ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी आहे. दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळतील असा अंदाज होता. पण आॅनलाइन गुण पाहिल्यावर मला आधी विश्वासच बसला नाही, असे नयनिकाने आवर्जून सांगितले. नववीपासूनच शाळेत दहावीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली होती. शिक्षकांनी पेपर सोडवून घेतले होते.
फेसबुकवर, व्हॉट्सअॅपने वेळ वाया जातो, असे तिने नमूद करीत या बाबींपासून दूर असल्याचे स्पष्ट केले. माझ्या पालकांनी नेहमीच मदत केल्याचे तिने सांगितले. नयनिकाला चित्रकला, गायन, नृत्याची आवड आहे. तिने सर्वाधिक गुण ९८ कॉम्प्युटरमध्ये मिळवले आहेत. आपला आवडता विषय इतिहास असल्याचे तिने या वेळी सांगितले.