मुंबई : अमेरिकेचे मुंबईतील राजदूत एडगार्ड केगन यांनी सोमवारी देशातील २६ शिपिंग कंपन्यांचा गौरव केला. अमेरिकन कोस्ट गार्डच्या (यूएससीजी) आॅटोमॅटेड म्युच्युअल असिस्टंट व्हेसल रेस्क्यू (एएमव्हीईआर) या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. या वेळी शिपिंगच्या महासंचालक डॉ. मालिनी शंकर उपस्थित होत्या.
भर समुद्रात बिघडलेल्या व संकटात सापडलेल्या जहाजांना त्वरित व पुरेशी मदत देऊन त्यांना सहिसलामत किनाऱ्यावर आणण्याचे उद्दिष्ट एएमव्हीईआरद्वारे पूर्ण करण्यात येते. संकटात सापडलेल्या जहाजांना व त्यामधील कर्मचारी, अधिकाºयांना सुरक्षितपणे बंदरावर आणणे व समुद्रातील शिपिंग आॅपरेशन्स कार्यरत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या वेळी राजदूत केगन म्हणाले, एएमव्हीईआर हे परस्पर सहकार्य व भागीदारीचे उत्तम उदाहरण आहे. या गौरव समारंभाच्या माध्यमातून आम्ही भारतीय व्यापारी जहाजांवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांनी जागतिक व्यापार व आंतरराष्ट्रीय समु्द्रातील सुरक्षिततेला कायम ठेवण्यासाठी दिलेल्या योगदानाला गौरवत आहोत. भारत-अमेरिका दोस्ती प्रकल्प व सहकार्यामध्ये याद्वारे नवीन दालन उघडले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.शिपिंग कॉर्पोरेशनच्या महासंचालक डॉ. मालिनी शंकर म्हणाल्या, एएमव्हीईआरच्या माध्यमातून समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय हद्दीत संकटात सापडलेल्या जहाजांना मदत करण्याची संधी मिळते. स्वतंत्रपणे साहाय्य करण्याऐवजी अशा प्रकारच्या परस्पर सहकार्यामुळे समुद्रामध्ये आलेले कोणतेही संकट परतवणे सहजसाध्य होते. एएमव्हीईआर हे जागतिक पातळीवरील सरकारी व खासगी सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. एएमव्हीईआर हे यूएससीजीतर्फे राबविण्यात येणारी मोहीम असून त्याद्वारे समुद्रात संकटात सापडलेल्या जहाजाला देश न पाहता मदत करण्यात येते. व्यापारी जहाजांद्वारे अशा वेळी मदत केली जाते. १९५८ मध्ये याला प्रारंभ करण्यात आला. जगातील १४० हून अधिक देशांचा या मोहिमेमध्ये सहभाग आहे. आजपर्यंत ७ हजार ८५० हून अधिक जहाजांना याद्वारे मदत पोेहोचवण्यात आली आहे.