अभ्यासाला कंटाळून सोडले घर, मानखुर्दमधील अल्पवयीन भावंडांचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:25 AM2017-12-13T02:25:32+5:302017-12-13T02:26:25+5:30
अभ्यासाचा कंटाळा करत दोघांनीही सलग तीन दिवस शाळेला दांडी मारली. त्यानंतर चौथ्या दिवशी अचानक आईने शाळेत येण्याचा हट्ट धरला आणि दांडी मारल्याचे बिंग फुटेल अशी भीती दोघांना वाटू लागली.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : अभ्यासाचा कंटाळा करत दोघांनीही सलग तीन दिवस शाळेला दांडी मारली. त्यानंतर चौथ्या दिवशी अचानक आईने शाळेत येण्याचा हट्ट धरला आणि दांडी मारल्याचे बिंग फुटेल अशी भीती दोघांना वाटू लागली. अखेर घाबरलेल्या या दोन अल्पवयीन भावंडांनी चक्क घरातून पळ काढला. त्यानंतर पोलीस पकडतील या भीतीने दुसºया दिवशी ते स्वत:च घरी परतले. ही घटना मानखुर्दमध्ये घडली.
मानखुर्द परिसरात ११ वर्षांचा रोहन, १७ वर्षांचा आकाश (नावात बदल) ही दोन भावंडे कुटुंबीयांसोबत राहतात. दोघांचेही अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्यांना अभ्यासाचा कंटाळा होता. त्यामुळे आकाशने शाळेला जाण्याऐवजी शाळेला दांडी मारून बाहेर फिरण्याचा निर्णय घेतला. दादासोबत फिरायला जायला मिळणार म्हणून धाकटा भाऊही तयार झाला. दोघेही शाळेला दांडी मारून मुंबईचा फेरफटका करून आले. सलग तीन दिवस त्यांनी शाळेला दांडी मारली.
अशात आईने शाळेत सोडण्यासाठी येते. शिक्षकांसोबत भेटही होईल आणि अभ्यास कसा सुरू आहे, हेही समजेल, असे सांगत चौथ्या दिवशी त्यांच्यासोबत शाळेत येण्याची तयारी केली. ते ऐकताच दोघांच्याही भुवया उंचावल्या. त्यांनी आईला शाळेत येऊ नकोस, सर्व ठीक आहे, असे सांगितले. मात्र, आई ऐकायला तयार नव्हती. आई शाळेत आल्यास दांडी मारल्याचे बिंग फुटेल या भीतीने दोघांनीही घर सोडण्याचा निर्णय घेतला.
मध्यरात्री ३.१५च्या सुमारास घरातली मंडळी झोपली असताना दोघांनीही घर सोडले. सकाळी ६.३०च्या सुमारास दोन्हीही मुले घरात न दिसल्याने आईची तारांबळ उडाली. आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र, दोघांचाही काहीच थांगपत्ता न लागल्याने आईने मानखुर्द पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
मित्र- मंडळी, नातेवाईक, शाळेतील शिक्षक यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस सुरू केली. मात्र, दोघांचीही काहीच माहिती मिळाली नाही. अशात पोलिसांचाच ससेमीरा मागे लागल्याची माहिती या दोन भावंडांना मिळाली आणि पकडलो गेलो की पोलिसांच्या ओरड्याचीही भर पडेल, या भीतीने दुसºया दिवशी दोघेही घरी परतले.
आईला सॉरी म्हणत दोघांनीही वरील घटनाक्रम आईला सांगितला. मात्र, अखेर मुले सुखरूप घरी परत आल्याने आईसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे मानखुर्द पोलिसांनी सांगितले.
अभ्यासाचा कंटाळा म्हणून शाळेला दांडी मारली. पकडले जाण्याच्या भीतीने दोघांनी घर सोडले होते. मात्र, दोघेही स्वत:च घरी परतले. दोघेही सुखरूप आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
- संजय वर्णेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानखुर्द पोलीस स्टेशन