गनन सदन तेजोमय मध्ये सागर रेड्डी, योगिता तांबे, अनघा मोडक यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 07:01 PM2018-11-07T19:01:41+5:302018-11-07T19:15:37+5:30

गेली १५ वर्षे समाजात निरलस वृत्तीने काम करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम अँड फिझ या संस्थेच्या वतीने सातत्याने होत आहे.

Pride of Sagar Reddy, Yogita Tambe, Angha Modak in Gunan Sadan Tejoym | गनन सदन तेजोमय मध्ये सागर रेड्डी, योगिता तांबे, अनघा मोडक यांचा गौरव

गनन सदन तेजोमय मध्ये सागर रेड्डी, योगिता तांबे, अनघा मोडक यांचा गौरव

Next

मुंबई : आयुष्यात जगण्यासाठी सकारत्मकपणाची जिद्द ज्यांनी दिली व तेजस्वीपणा दिला त्याचे ऋण या पुरस्कारामधून व्यक्त करण्याची संधी मला मिळाली आहे, पण हा पुरस्कार माझा नसून ज्यांनी माझ्या आयुष्याच्या वाटेवर दिवा लावल्यामुळे अंधारातही माझी पावले आपोआप उजळून निघाली त्या सर्वांना हा पुरस्कार मी अर्पण करीत अशी कृतज्ञता व्यक्त केली अनघा मोडक यांनी तर ६५ हुन अधिक तालवाद्य वाजवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आगळीवेगळी नोंद करुन आता १०० हून अधिक तालवाद्य वाजवून गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करुन जागतिक विक्रम करु पाहण्याची जिद्द व्यक्त करणा-या योगिता तांबे आणि अनाथांचा नाथ म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारे सागर रेड्डी या तिन्ही असामान्य व्यक्तींचा आणि त्यांच्या सकारात्मक कार्याला आज ध्यास सन्मान पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
गेली १५ वर्षे समाजात निरलस वृत्तीने काम करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम अँड फिझ या संस्थेच्या वतीने सातत्याने होत आहे. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर मध्ये आयोजित अँड फिझ प्रस्तुत गगन सदन तेजोमय या दिवाळी पहाट च्या सुरेल संगीतमय कार्यक्रमात ध्यास सन्मान पुरस्काराचे वितरण कँम्लिनचे श्रीराम दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्रिगुणात्मक त्रैज्योतीची अखंड उज्ज्वल किर्ती असलेले बाबूजी, गदिमा आणि पुलंच्या प्रतिभेला ही दिवाळी पहाट समर्पित करण्यात आली. या सुरेल मैफलीचे निवेदन सुप्रसिध्द अभिनेत्री स्पृहा जोशी व सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी यांनी केले. तर अतुल परचुरे व समीर चौगुले यांनी यावेळी पुंलंच्या साहित्यकृतीवर आधारीत नाट्य उतारा सादर केला. विजय केंकरे, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, समीर चौगुले,स्पृहा जोशी, अजित परब, केतकी भावे,नचिकेत लेले, प्रियांका बर्वे, अर्चिस लेले, विजय जाधव, महेंद्र शेडगे, महेश खानोलकर, राहुल देव, वरद कठापूरकर, अमित गोठीवरेकर, कमलेश भडकमकर आदी मान्यवरांचा याप्रसंगी सहभाग होता.  यावेळी डॉ. अलका मांडके उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची संकल्पना विनोद पवार यांची असून गनन सदन तेजोमय चे संयोजन महेंद्र पवार यांनी केले आहे. यावेळी तळकोकणातील मालवणचे श्री जयंती देवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब, मालवण चे २५ कलाकारांनी आपली पारंपारिक नृत्ये सादर केली.
नवी मुंबई च्या एकता निराधार संस्थेचे सागर रेड्डी यांना अनाथांचा सागर म्हणून ओळखले जात आहे. आई-वडिलांच्या प्रेमविवाहला समाजाने विरोधच केला नाही तर त्यांची हत्या केली आणि त्यात सुदैवाने वाचला ३ महिन्यांचा सागर. त्याच्या जिवाला धोका नको म्हणून त्या लहानग्या बाळाला आजोबांनी लोणावळ्याच्या अनाथाश्रमात ठेवलं. अठरा वर्षांनी तिथून बाहेर पडायला लागल्यावर हाती शून्य घेतलेल्या सागरने जगण्याचे चटके सोसले. शिक्षणाची आस होती, एका भल्या माणसाने त्याला इंजिनीयर होण्यासाठी सारी मदत केली. उत्तम नोकरी होती, हातात पैसा आला होता. पुढचे आयुष्य सुखात जाऊ शकले असते, मात्र सागर आपल्या सहकाऱ्यांना भेटायला अनाथाश्रमात गेला आणि त्याच्या जीवनाचे ध्येय बदलले. अनाथांचा तो नाथ झाला. ३०-४० करत हजारावर अनाथांना त्याने मदतीचा हात दिला. त्यांना निवास, अन्न, शिक्षण व संसार यासाठी आपली मिळकत लावली. त्याचा हा यज्ञ चालूच आहे.
दुस-या ध्यास सन्मान पुरस्कार विजेत्या जन्मापासून दृष्टी अधू असलेल्या योगिता तांबे. दहावीपर्यंत थोडेफार पाहू शकत होत्या. दहावीत घाईत अपघाताने, आंघोळीच्या वेळी पडलेला साबण उचलताना त्यांच्या उजव्या डोळ्यात नळ घुसला. खूप रक्त गेलं. दुर्दैवानं त्यात त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्ण गेली. ताल हा लहानपणापासून त्यांच्या नसात भिनलेला होता. आपल्या दृष्टीहीनतेवर मात करत त्या आज  ५० हून अधिक वाद्य वाजवतात. इतकंच नाही, त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलंय. त्या आता मुलांना वादन शिकवतात. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. असामान्य कर्तृत्व म्हणजे काय याचा त्या आदर्श आहेत.
तिस-या ध्यास सन्मान पुरस्कार विजेत्या वयाच्या पंचविशीपर्यंत सुदृढ आयुष्य जगणाऱ्या, निसर्गात रामणाऱ्या, रंगांची आवड असणाऱ्या अनघा मोडक याना डेंग्यूचं निमित्त झालं आणि दृष्टी निकामी झाली. रुपरेलमधून पदवी, मासमीडिया कोर्स, रेडिओवर निवेदक, कार्यक्रमांचं निवेदन या साऱ्यावर अचानक लगाम लागला. मात्र हार न मानता अनेकांच्या प्रोत्साहनाने अनघा आजही निवेदनाची कामे करतात. एका चॅनेलवर त्यांनी अशाच शारीरिक अभावग्रस्त, दिव्यांग व्यक्तींच्या मुलाखतीची मालिकाच केली. आयुष्यात खाचखळगे येतात, त्यांना डगमागून न जाता आपण पुढे जात राहिलं पाहिजे, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, असं त्या सहज बोलून जातात. 
याप्रसंगी गगन सदन तेजोमय या सुरेल गीतांच्या कार्यक्रमात ज्यांनी गेल्या १५ वर्षाच्या प्रवासामध्ये मोलाची साथ दिली त्या महनीय व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.

Web Title: Pride of Sagar Reddy, Yogita Tambe, Angha Modak in Gunan Sadan Tejoym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी