Join us

संस्कृत भाषेचा गौरव

By admin | Published: January 28, 2016 2:43 AM

संस्कृत भाषा, संस्कृती व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. एन. एस. रामानुज तताचार्य यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ८७ वर्षांच्या तताचार्यांनी ५० पेक्षा जास्त ग्रंथांचे लेखन केले आहे.

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

संस्कृत भाषा, संस्कृती व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. एन. एस. रामानुज तताचार्य यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ८७ वर्षांच्या तताचार्यांनी ५० पेक्षा जास्त ग्रंथांचे लेखन केले आहे. ६० शोधनिबंध प्रसिद्ध असून देश- विदेशातील २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले असून, त्यांनी व्रतस्थपणे केलेल्या कामाची दखल शासनाने घेतल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १६ ए मधील प्रोग्रेसिव्ह हायजेन इमारतीमध्ये राहणाऱ्या एन. एस. रामानुज यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच संस्कृत भाषेच्या अभ्यासकांसह नवी मुंबईकरांना आनंद झाला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी त्यांच्या घरी उपस्थिती दर्शविली आहे. तामिळनाडूमधील नवलपक्कम गावात जन्मलेले तताचार्य संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक आहेत. एम. ए. पीएचडीसह पदवीसह विविध विषयांमध्ये प्रावीण्य मिळविले आहे. पूर्ण आयुष्य संस्कृत भाषा, भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ६० शोधनिबंध जगप्रसिद्ध पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ८७ वर्षांच्या कार्यकाळात भारत, जपान, अमेरिका व इतर देशांमधील अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सहकार्य केले आहे. २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. संस्कृतमधील ५० पेक्षा जास्त ग्रंथांचे लेखन व भाषांतर त्यांनी केले आहे. पुणेमधील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजने संस्कृत डिक्शनरी बनविण्याचे काम सुरू केले आहे. या डिक्शनरीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला असून ती तयार करण्यासाठी तताचार्यांनी १९५८ ते ६४ मध्ये काम केले आहे. आजही त्यांच्या विद्वत्तेचे कौतुक डेक्कन कॉलेजमधील त्यांचे सहकारी करीत आहेत. तताचार्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेवून त्यांना देश- विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्तेही यापूर्वी त्यांचा गौरव झाला आहे. मद्रास शासकीय ग्रंथालयामध्ये संस्कृत पंडित, डेक्कन कॉलेज डिक्शनरी विभागाचे वरिष्ठ शास्त्री, तिरुपतीमधील के.एस.विद्यापीठामध्ये संशोधन सहायक, आर. एस. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय देशातील जवळपास १० मान्यताप्राप्त संस्कृत विद्यापीठ व संस्थांमध्ये निवड समिती सदस्य व इतर पदांवर त्यांनी काम केले आहे. इंडियन काऊन्सिल आॅफ फिलॉसॉफिकल रिसर्चकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला असून फ्रान्स सरकारनेही त्यांना पुरस्कार दिला आहे. - ६० शोधनिबंध विविध शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध - संस्कृत, साहित्य, तत्त्वज्ञान व भारतीय संस्कृती या विषयावर २५ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन - जपान, अमेरिका,जर्मनी व इतर देशांमधील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन- ५० पेक्षा जास्त ग्रंथांचे लेखन व भाषांतर- डेक्कन कॉलेज पुणेच्या ऐतिहासिक संस्कृत डिक्शनरीच्या निर्मितीसाठी योगदान- १९५८ ते ६५ - पुणेमध्ये देश व विदेशातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - १९६८ ते १९९३ पर्यंत शास्त्री व आचार्य क्लासेस वेदांत व इतर विषय भूषविलेली पदे...संस्कृत पंडित : गव्हर्नमेंट ओरिएंट लायब्ररी मद्रास सिनिअर शास्त्री : संस्कृत डिक्शनरी विभाग डेक्कन कॉलेज पुणेसंशोधन सहायक : के. एस. विद्यापीठ तिरुपतीप्राध्यापक : आचार्य टिचिंग विंग, के.एस. विद्यापीठ तिरुपतीप्राचार्य : के. एस. विद्यापीठ तिरुपतीकुलगुरू : आर. एस. विद्यापीठ तिरुपती२५ पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार १९८६ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानइंडियन काऊंन्सिल आॅफ फिलॉसॉफिकल रिसर्चकडून जीवनगौरव पुरस्कार फ्रान्स सरकारकडून २०१२ मध्ये विशेष सत्कारउत्तर प्रदेश सरकारचा विश्वभारती पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे घरी जावून स्वागत केले असून शहरवासीयांच्यावतीने त्यांचा नागरी सन्मानही केला जाणार आहे. साधी राहणी उच्च विचारडॉ. एन. एस. रामानुज तताचार्य वयाच्या ८७ व्या वर्षीही लेखन व वाचनासाठी सर्वाधिक वेळ देत आहेत. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणीचे विद्वान म्हणून त्यांची ख्याती आहे. या वयामध्येही ते स्वत:ची सर्व कामे स्वत:च करत आहेत. स्वत:चे कपडेही स्वत: धुण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. व्रतस्थपणे त्यांचा विद्याव्यासंग व ग्रंथलेखनाचे काम सुरू आहे.वडील श्वासही संस्कृतमधूनच घेताततताचार्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्या परिवारातील सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे. कॉम्प्युटरमध्ये पीएचडी केलेल्या व रोल्टा कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणारा त्यांचा मुलगा एन. आर. श्रीनिवास राघवन यांनी सांगितले की, वयाच्या ८७ व्या वर्षीही वडील ४ ते ५ तास ग्रंथ लेखन करत असतात. जास्तीत जास्त वेळ वाचन व लिखाणामध्येच जात असतो. ते श्वासही संस्कृतमध्येच घेतात का असे आम्हाला नेहमीच वाटते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याचा आम्हा सर्वांनाच आनंद झाला आहे. यामुळे संस्कृत भाषेमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. वडिलांनी नेहमीच सर्वांना प्रेरणा दिली असून अनेक विद्वान घडविले. आम्हालाही उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. यामुळेच मीही कॉम्प्युटरमध्ये पीएचडी मिळवू शकलो. आईचे २०१२ मध्ये देहावसान झाले. तेव्हापासून पत्नी अनुशा त्यांची देखभाल करत असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या तताचार्यांनी अनेक महत्वपुर्ण ग्रंथ लिहीले आहेत. त्यांचा शहरवासीयांच्यावतीने लवकर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदार संघ तताचार्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याने नवी मुंबईच्या लौकिकामध्येही भर पडली आहे. त्यांनी व्रतस्थपणे केलेल्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली. - नरेंद्र पाटील, आमदार