मनोहर कुंभेजकर
मुंबई : दिवाळीला सणांचा राजा मानतात. या दिवसात आपण सगळेच आपआपल्या मित्रमंडळी, आप्तस्वकियांची भेट घेतो. पण समाजाच्या एका महत्वाच्या पण दुर्लक्षित भागाची आपल्याला साधी आठवण सुद्धा येत नाही, तो भाग म्हणजे स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत जितक्या धैर्याने पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेली 8 महिने अविरत लढत आहे. तितक्याच किंबहुना थोड्या जास्त धैर्याने हे स्मशानभूमीतले कर्मचारी सुद्धा लढत होते. कोरोनाने मृत्यु झालेल्या नागरिकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांचे आप्तस्वकीय उपस्थित असतांना व नसताना देखील त्यांनी अंत्यसंस्कार करण्याचे कार्य यथायोग्य पार पाडले. त्यामुळे दुर्लक्षित अंधेरी पूर्व पारशीवाडा स्मशानभूमीत कोरोना काळात अविरत काम करणाऱ्या स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांचा शिवसेनेने आगळा वेगळा गौरव केला.
कोरोनाग्रस्त मृत कुटुंबांच्या दुःखात साथ देणाऱ्यांना आपल्या आनंदात सामील करून घेण्याची आपली संस्कृती आहे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ही शिकवण दिली आहे. या शिकवणीचे पालन करत गेल्या मार्च पासून येथील पारशीवाडा स्मशानभूमीत कोरोना काळात गेली आठ महिने अविरत सेवा करणाऱ्या येथील कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत सुमारे 750 हून अधिक कोरोनाग्रस्त मृत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहे. येथील स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांनी जी माणुसकी व जे धैर्य दाखवलं त्याला मनापासून सलाम करण्यासाठी येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या या दुर्लक्षित कोरोना योद्यांचा कर्मचाऱ्यांचा राज्याचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री,विभागप्रमुख अँड.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे वतीने भेटवस्तू,फराळ देऊन सत्कार केला अशी माहिती शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी लोकमतला दिली. यावेळी अमित जोशी, जितेंद्र शिर्के, मधू गुरव, संदीप पेडणेकर, आशीष कांबळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.