Join us

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी प्राथमिक कामास सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 6:07 AM

दोन महिन्यांसाठी वाहतूक बंद राहणार

मुंबई : सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे प्राथमिक काम सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र हा पूल वाहतुकीसाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बंद करण्यात येणार आहे. आता म्हणजे सुरुवातीला २० एप्रिलपासून प्राथमिक काम हाती घेण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येत आहे. साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. वाहनचालकांना उड्डाणपुलाखालील रस्ता हा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध असेल. या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबविली. कंत्राटदाराची नियुक्ती केली. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांबरोबर बैठकाही पार पडल्या. उड्डाणपुलाला १७० बेअरिंग आहेत.दुरुस्तीच्या कामादरम्यान कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मोठ्या वाहनांना येथून ये-जा करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मोठी वाहने येथून जाऊ नयेत यासाठी येथे बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. सोबतच येथे वाहतूक पोलिसांनी चौकी उभारून मोठ्या वाहनांना मज्जाव केला जात आहे.