मुंबई : भारतात तयार झालेल्या लसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९३ देशांना विकल्या. त्यामुळे देशातील नागरिकांना आज लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. या कृत्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकार यांचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आज उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
उत्तर मुंबईतील बोरिवली पश्चिम, मालाड-मालवणी, कांदिवली पश्चिम, दहिसर, मागाठाणे विधानसभा - बोरिवली पूर्व, कांदिवली पूर्व या विधानसभा क्षेत्रांमध्ये मुंबई काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हातात 'मोदीजी हमारे बच्चो की व्हॅक्सिन को विदेश क्यूं भेज दिया?' असा मजकूर लिहिलेला फलक घेऊन साखळी आंदोलन केले व नरेंद्र मोदी सरकारला जाब विचारला.
बोरिवली पश्चिम रेल्वेस्थानकासमोर, एस. व्ही. रोड येथे मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये भूषण पाटील यांच्यासमवेत मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक सुत्राळे, महासचिव सदा चव्हाण, कमलेश शेट्टी, सचिव मनोज नायर, राजेश निर्मल व कुमार खिल्लारे, उत्तर मुंबई काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रगती राणे, नगरसेविका श्वेता कोरगावकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे दिनेश जानी, उत्तर मुंबई युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वरुण पाटील, मुंबई काँग्रेस बोरिवली विधानसभेचे पदाधिकारी मदन कदम, प्रशांत परदेशी आणि प्रफुल्ल वाघेला सहभागी झाले होते, तसेच मुंबई काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
------------------