Narayan Rane vs Shivsena: केंद्रात आपलं सरकार असल्याचं सांगून नारायण राणे जर राज्यात नंगा नाच घालत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहन करतील असं वाटत नाही. ते नक्कीच राणेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. राणेंविरोधात राज्यात विविध ठिकाणी गुन्ह्यांची नोंद झाली असून नाशिक पोलीस राणेंच्या अटकेसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी चिपळूनमध्ये माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान केलं.
"मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय? नाशिकचे आयुक्त राष्ट्रपती आहेत का आदेश द्यायला? आमचं पण वरती सरकार आहे, शिवसेनेला मी भीक घालत नाही. बघुया यांची उडी कुठपर्यंत जाते", असं वक्तव्य नारायण यांनी केलं. त्यावर विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
"राणेंनी काल मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आज त्यांनी थेट माध्यमांना धमकी दिली. राणे आणि त्यांच्या चंगू मंगूंनी प्रत्युत्तराची भाषा करु नये. राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर वाट्टेल ते बोलत सुटले आहेत. ज्यांनी आजवर आपल्या पदाचं भान विसरुन काम केलं त्यांना मोदींनी योग्य धडा शिकवला आहे. केंद्रात सरकार असल्याचं सांगून राणे नंगा नाच घालत असेल तर मोदी सहन करतील असं वाटत नाही. राणेंना त्याची किंमत मोजावीच लागेल. येत्या निवडणुका भाजपाला मूठमाती देणाऱ्या ठरतील", असं विनायक राऊत म्हणाले.
मोदींना पत्र लिहून केली राणेंच्या राजीनाम्याची मागणीनारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असे पत्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. अशी भाषा सहन करू नये, शिष्टाचार राखला पाहिजे", असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे?नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. त्यावरुन नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.