मुंबई : माध्यमांचे काम जेवढे प्रभावी होईल तेवढे देशाचे लोकतंत्र मजबूत तर होईलच; पण देशाचाही फायदा होईल. मीडिया केवळ मूक दर्शक राहू शकत नाही. देशाला दिशा देण्याची मोठी जबाबदारी माध्यमांवर असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या भव्य इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा उपस्थित होते.
एखादा कार्यक्रम सरकारने जाहीर केला तर तो सरकारचा कार्यक्रम नसतो. तो कार्यक्रम माध्यमांनी घराघरांत नेला पाहिजे. देशाचा मीडिया राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही विषयांच्या बाबतीत विकासाशी जोडला गेला तर त्याचा फायदा देशाला होईल, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, पर्यावरण, पर्यटन हे विषय देशाचे विषय आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या भावनेतून पर्यावरणाकडे बघितले पाहिजे. देशाचे पर्यटन वाढवण्यासाठी माध्यमांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आज आपल्या माध्यमांना ग्लोबल प्रेझेन्स वाढवण्याची गरज असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. वृत्तपत्रात जागा कमी असते, हे मला माहीत आहे. मात्र, डिजिटल माध्यमांत खूप जागा आहे. या माध्यमातून आपण सगळे नव्या विचारांना पुढे घेऊन जाल आणि लोकशाहीला पुढे न्याल. तुम्ही जेवढे सशक्त होत काम कराल तेवढ्या वेगाने देश पुढे जाईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील ही नवी इमारत मुंबईत आधुनिक तसेच कार्यक्षम कार्यालयीन जागेची आयएनएसच्या सदस्यांची गरज पूर्ण करेल. मुंबईतील वर्तमानपत्र उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करेल, असे सांगून इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे (आयएनएस) प्रेसिडेंट राकेश शर्मा यांनी पंतप्रधान आणि अन्य मान्यवरांचे स्वागत केले. आयएनएसची भूमिकाही त्यांनी यावेळी विशद केली.
महाराष्ट्रात आयएनएसची स्वतंत्र इमारत असावी, अशी कल्पना सगळ्यात आधी आयएनएसचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी मांडली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे त्यांनी केवळ कल्पनाच मांडली नाही तर बीकेसीमध्ये यासाठी चांगली जागा द्यावी, असेही सुचवले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी जागा मिळावी म्हणून देशमुख आणि वेगवेगळ्या यंत्रणांशी पत्रव्यवहार सुरू केला. त्याचा सातत्याने पाठपुरावाही केला. विलासराव देशमुख यांच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्याशीही डॉ. विजय दर्डा यांनी सतत समन्वय साधत हे काम कसे मार्गी लागेल, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही जागा मिळू शकली. आज त्या जागेवर आयएनएसची भव्य इमारत उभी झाली आहे.
आज मी समाधानी आहे
देशाची राजधानी दिल्ली येथे ‘आयएनएस’ची स्वतंत्र इमारत आहे. महाराष्ट्रात अशी इमारत नसल्याची मला खंत होती. मी आयएनएसचा प्रेसिडेंट असतानाही ही संकल्पना सदस्यांपुढे मांडली आणि सतत पाठपुरावाही सुरू केला. तेव्हाच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. माझ्याबरोबर हरमोसजी कामा, नरेश मोहन आणि आयएनएसचे नंतरच्या कालावधीतील सर्व प्रेसिडेंट यांनी देखील ही इमारत पूर्ण होण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, याचे मला समाधान आहे. त्यामुळेच आज ही भव्य इमारत आकाराला आली आहे -डॉ. विजय दर्डा