Join us  

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 6:01 PM

Narendra Modi : मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच १३ जुलैला मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते महापालिकेच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जात आहे.  शनिवारी, १३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगांव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच, मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवले जाते. या केंद्राचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने ते नव्याने बांधण्यात येणार आहे. याचेही भूमिपूजन होणार आहे. 

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचा फायदा...- पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता - पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल. - पश्चिम उपनगरातून नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वेगाने गाठता येईल.   - नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा होईल.- जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होईल.- गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून जवळपास २५ मिनिटे होईल.

टॅग्स :नरेंद्र मोदीमुंबईमुंबई महानगरपालिका