'आम्ही नेमकं काय बोलतोय...?'; नरेंद्र मोदींसोबतचा फोटो शेअर करत फडणवीसांनी केलं ट्विट
By मुकेश चव्हाण | Published: January 20, 2023 12:12 PM2023-01-20T12:12:38+5:302023-01-20T14:00:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली ते मोगरा असा रिटर्न प्रवास केला.
मुंबई: मुंबईची कोंडी फोडणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या उर्वरित टप्प्याला गुरुवारी अंधेरी येथील गुंदवली स्थानकात मेट्रोला ग्रीन सिग्नल देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली ते मोगरा असा रिटर्न प्रवास केला. या प्रवासादरम्यान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील संवाद साधला.
मेट्रोच्या प्रवासादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, मुंबईकर यांच्यासह मेट्रो कामगारांसोबत प्रवास करतानाच त्यांच्यासोबत संवादही साधला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही प्रवास करताना होत असलेल्या गप्पांमुळे हास्याचे फवारे उडत असल्याचे चित्र होते. याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही सदर फोटो ट्विट करत नेमकं काय बोलताय, अंदाज लावा, असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटर अनेक युर्जसने विविध प्रतिक्रिया दिली आहे.
Guess the conversation.. 😄 pic.twitter.com/xaQh7RHbQE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2023
वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा मेट्रोकडे वळला. अंधेरी परिसरातील गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकात दाखल होतानाच मोदी यांनी आपल्या ताफ्यातून मुंबईकरांना हात उंचावून दाखविले. मेट्रोचा प्रवास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ७ च्या सुमारास अंधेरी येथील गुंदवली स्थानकात दाखल झाले होते.
प्रधानमंत्री @narendramodi यांनी गुंदवली स्थानकातून मेट्रोने प्रवास केला. यावेळी विद्यार्थी, कामगार, महिला यांच्यासह इतर मुंबईकरांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.#MumbaiOnFastTrack#MumbaiMetroOurMetro#AmchiMumbaiMetropic.twitter.com/QyQLWeahz1
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 19, 2023
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क तयार करणे हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या भौतिक प्रगतीच्या दिशेने प्रवास २०१४ मध्ये पहिल्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतर सुरू झाला. या मेट्रो मार्गांची पायाभरणी २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर युटिलिटी शिफ्टिंग, भूसंपादन, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या अनेक अडथळ्यांचे निराकरण केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातले पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. मेट्रो मुंबईकरांची नवी जीवनवाहिनी ठरणार असल्याचं एमएमआरडीए महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितलं.