Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कामाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 9:37 PM

 विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवणा-या देशातील केवळ ४०० कर्तबगार महिलांना ' जागतिक महिला दिना' चे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास भावनिक पत्र लिहिले आहे.

 - मनोहर कुंभेजकर 

मुंबई - विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवणा-या देशातील केवळ ४०० कर्तबगार महिलांना ' जागतिक महिला दिना' चे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास भावनिक पत्र लिहिले आहे. देशातील पहिली डिजिटल सॅनिटरी पॅड बँक सुरु करणा-या वर्सोव्यातील भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या देखील कामाची प्रशंसा करत ' राष्ट्रीय पोषण मिशन’ या भारत सरकारच्या नव्या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत देशातून कुपोषण हटवण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.या योजनेचा मुख्य उद्देश बुटकेपणा,अल्प पोषण, रक्ताची कमतरता आणि कमी वजनाच्या शिशूंची संख्या कमी करणे आहे असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

 आमदार डॉ.लव्हेकर यांची ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक ' मासिक पाळीवेळी महिलांच्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करण्यासाठी झटत आहे. देशातील गरजू महिलांना 'ती सॅनिटरी पॅड बँके' च्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो. 'ती सॅनिटरी पॅड बँके' तर्फे दरमहा गरीब विद्यार्थिनी आणि स्त्रियांना १० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले जाते. मेन्स्ट्रुअल हेल्थ किटमध्ये विविध सूचना, मानसिक आधार देण्यासाठीची माहिती, २ निकर्स, पेनकिलर्स आणि सॅनिटरी पॅड्स या गोष्टी देण्यात येतात.त्या 'बेटी बचाव, बेटी पढाओ ' या मोहिमेचाही प्रचार व प्रसार करत असून गेल्या अडीच वर्षांपासून ' डॉटर्स ऑफ वर्सोवा' मोहीम राबवत असून त्याअंतर्गत ज्या घरी मुलगी जन्मते तिथे जाऊन त्या मुलीचे स्वागत करून समाजामध्ये मुली वाचवा त्यांना शिक्षण द्या असा संदेश त्या देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच नारी शक्तीला सलाम करत "विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करत असताना आपण केवळ स्त्रीचा सर्वांगीण विकासच नव्हे तर स्त्रीकेंद्री विकास साधण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया. जेव्हा आपल्या देशातील महिला सर्वार्थाने सक्षम होतील तेव्हाच भारताचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल." अशी साद त्यांनी या पत्राद्वारे घातली आहे.

टॅग्स :भारती लव्हेकरनरेंद्र मोदी