मुंबई - मेट्रोच्या तीन मार्गिकांचं शनिवारी (7 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमीपूजन केलं आहे. या माध्यमातून मोदींनी मिशन महाराष्ट्रचा श्रीगणेशा केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली. मोदींनी विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेतले. तसेच लोकमान्य सेवा संघाचे आणि पार्ल्याच्या सांस्कृतिक समृद्धतेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
थोर साहित्यिक स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून लोकमान्य सेवा संघातील पु. ल. गौरव कला दालनात पु. ल. च्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी " या दालनात आलेली मंडळी दिवसातून किती तास हसतात ? "असे विचारत, " पु. ल. देशपांडे का नाम बोले और हसे नही, तो कैसे चलेगा " असे उद्गार काढत पु. ल. देशपांडेंच्या गुणवैशिष्ट्याचा गौरव केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विले पार्ल्याच्या इतिहासाचे दोनही खंड संस्थेमार्फत तर आमदार पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणी लिखित तसेच ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर लिखित पुस्तकेही देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चितळे, कार्याध्यक्ष उदय तारडाळकर, उद्योजक दीपक घैसास,आमदार पराग अळवणी तसेच पार्ल्यातील सर्व नगरसेविका सुनीता मेहता व ज्योती अळवणी,नगरसेवक अनिष मकवनी, अभिजित सामंत, मुरजी पटेल व मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे 42 किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-11 वरील 12.7 किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-12 वरील 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.
पंतप्रधान यांनी अद्ययावत मेट्रो भवनचे भूमीपूजनही केले. ही 32 मजली इमारत असून 340 किलोमीटर अंतराच्या 14 मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल. पंतप्रधान यांनी कांदिवली पूर्व इथल्या बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचे उद्घाटन त्यांनी केले. महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन पंतप्रधान यांनी केले.