Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतायत राष्ट्रपिता महात्मा गांधींची जागा

By admin | Published: January 12, 2017 8:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींची जागा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींची जागा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र समोर आलं आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दरवर्षी छापण्यात येणा-या 2017च्या कॅलेंडरवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे मोदी फारच चर्चेत आले आहेत. खादी ग्रामोद्योगाचे कर्मचारीही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जागी मोदींचा फोटो पाहून बुचकळ्यात पडले आहेत. या फोटोत नरेंद्र मोदी चरखा चालवताना दाखवण्यात आले आहेत. याआधी कॅलेंडरवर महात्मा गांधींचा फोटो छापला जात होता. खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेनाही हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. ते म्हणाले, गांधींच्या तत्त्वज्ञानावरच खादी ग्रामोद्योग उभा आहे. तेच आमचे आदर्श आहेत. खादी ग्रामोद्योगाचे ते आत्मा आहेत. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करण्याबाबत काही प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब-याच काळापासून खादी परिधान करत आहेत. मोदींनी खादीमध्ये स्वतःची स्टाइल विकसित केली असून, भारतीयांसमवेत विदेशातील लोकांनाही ती आकर्षित करत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी खादीचे सर्वात मोठे ब्रँड अँबेसेडर आहेत. त्यांच्या मेक इन इंडियाच्या कार्यक्रमांतर्गत खादी ग्रामोद्योग गावागावातील लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच मार्केटिंगवरही विशेष महत्त्व दिलं जात आहे. मात्र आयोगाच्या एका कर्मचा-याने नाव न घेण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारे महात्मा गांधींचे विचार आणि आदर्शांना पायदळी तुडवण्याच्या होत असलेल्या प्रकारामुळे आम्ही दुखी आहोत. 2016लाही खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर मोदींचा फोटो छापण्यात आला होता. त्यावेळीही खादी ग्रामोद्योग आयोगातल्या युनियननं आक्षेप घेतला होता.