लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार; ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:47 AM2022-02-06T11:47:08+5:302022-02-06T11:56:34+5:30
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानं ८ जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांना न्युमोनिया झाला. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. 'लताजींसारखा कलाकार शतकांतून एकदा जन्माला येतो. लता दीदी या उत्तम माणूस होत्या. त्यांचा स्वर्गीय आवाज आता कायमचा शांत झाला आहे. पण त्यांचं गाणं अमर राहील. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशा शब्दांत कोविंद यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी ४ वाजता नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार असून ४.३० ते ५ दरम्यान ते दादरमधील शिवाजी पार्कमध्ये पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लता मंगेशकर यांचं ब्रीच कॅंडी रुग्णालयात सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झालं. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं अंतिम दर्शनासाठी लतादीदींचं पार्थिव ठेवलं जाणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मी माझं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही-
मी माझं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. 'दयाळू आणि काळजी करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे देशात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती,' अशा शब्दांत मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लतादीदींवर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे.