नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांनाही वेदना झाल्या- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:06 PM2022-02-08T12:06:07+5:302022-02-08T12:17:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली/ मुंबई: कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम पंजाब, उत्तराखंडमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देखील वाईट वाटलं. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान करणं हे दुर्देवी, असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, श्रमिक ट्रेन सोडल्याबद्दल महाराष्ट्रातील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आभार मानले होते. तसेच श्रमिक ट्रेन राज्यांनी नव्हे, तर केंद्र सरकारने सोडल्या होत्या, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी करुन दिली. तसेच कोरोनाच्या महामारीमध्ये आपण माणुसकी विसरलो का, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट. ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण १८ खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
हा तर महाराष्ट्राचा अपमान- खासदार संजय राऊत
संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केला, त्यावर महाराष्ट्र सरकारने बोलायला हवे. उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. राज्यातील अनेक डॉक्टर, नर्सेस यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केले, हा त्यांचाही अपमान आहे', असे राऊत म्हणाले.
भाजपा नेत्यांनी बोलावं-
ते पुढे म्हणतात, 'कोरोना या जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला. जागतिक आरोग्य संघटनेने याचा खुलासा केला आहे. त्यांनी कोरोना काळात धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. पण, महामारीचे खापर महाराष्ट्रावर खापर फोडण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या कामाचे दाखले स्वतः सुप्रीम कोर्टाने, हाय कोर्टाने दिले होते. आता यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील बोलायला हवं', असंही संजय राऊत म्हणाले.