"कोरोनाच्या विरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम जगात सर्वोत्तम" - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:35 PM2021-01-12T18:35:10+5:302021-01-12T18:36:40+5:30
Narendra Modi News : कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम जगात सर्वोत्तम आहे. कोरोनाच्या विरुध्द संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणाऱ्या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचेच काम केले.
मुंबई: “कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात, विशेषतः आरोग्य विषयक सुविधांच्या बाबतीत भारतापेक्षा कितीतरी पटीनी पुढे असलेल्या देशांत हाहाकार माजवला असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व धाडसी निर्णयामुळे 130 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश कोरोनाच्या हाहाकारापासून सुरक्षित राहू शकला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कोरोना विरुद्धच्या लढाईत केलेल्या कामाची भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर लिखित पुस्तिका व माहितीपट '56 इंचाची ढाल' चे प्रकाशन आज राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. बोरिवली पूर्व येथील कारुळकर प्रतिष्ठान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम जगात सर्वोत्तम आहे. कोरोनाच्या विरुध्द संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणाऱ्या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचेच काम केले. या सर्व आरोपांना सडेतोड उत्तर देणारे पुस्तक लिहिल्याबद्दल व नरेंद्र मोदी यांचे काम सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेल्या माहितीपटाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अतुल भातखळकर यांचे अभिनंदन केले.
"कोरोनाच्या महामारीतून देशाला वाचविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय, कडक लॉकडाऊन, 1 लाख 87 हजार कोटींचे गरीब कल्याण पॅकेज, 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत पॅकेज, लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग करून देशभर उभारलेले आरोग्य विषयक सुविधांचे जाळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशांतील सामान्य जनतेला या लढाईत सामील करून घेण्यासाठी वेळोवेळी उचललेली सकारात्मक पावले, इतकेच नव्हे तर 'वसूधैव कुटुंबकम्' या उक्तीचा प्रत्यय देत जगातील 150 पेक्षा अधिक देशांना विना अट मदत करण्याचे काम सुद्धा पंतप्रधानांनी केले आहे, आदी सर्व बाबी लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे", असे मत आमदार भातखळकर यांनी या पुस्तक व माहितीपट प्रकाशन सोहळ्याच्या वेळी मांडले.
या प्रकाशन सोहळ्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, भरत दाभोळकर, प्रशांत कारुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.