Join us  

लोकशाही संपली याची पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी, निकालानंतर उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 8:45 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण  आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण  आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. "हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हवी ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलं असून आता लोकशाही संपवून आम्ही बेबंधशाहीला सुरूवात केली आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

"न्याययंत्रणाही आपल्या दबावाखाली कसं येईल यावर केंद्रीय कायदामंत्री बोलतायत, राज्यसभेचे अध्यक्ष बोलतायत. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत," असं उद्घव ठाकरे म्हणाले. "आजचा निर्णय अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मधल्या काळात मी बोललो होतो तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोवर निवडणूक आयोगानं निकाल देऊ नको. कोणाची बाजू बरोबर हे केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यावरून ठरवायला लागलो, तर कोणीही धनाड्य माणूस आमदार खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. राज्याच्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानही होऊ शकतो हे देखील मी मागे बोललोय," असंही ते म्हणाले.“आज जी मिंधे गटाची आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. मी अनेकदा त्यांना आव्हान दिलंय. आता मला अशी शक्यता वाटतेय त्यावरून आता असं वाटायला लागलंय की कदाचित येत्या महिन्या दोन महिन्यात महापालिकेच्या निवडणुकाही जाहीर होऊ शकतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायची आहे. मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारी उभी करायची आहे. त्यांचं स्वप्न धनुष्यबाण हाती देऊनही करतील. कदाचित आमचं मशाल चिन्ह ते देखील ते घेतील. पण मशाल आता पेटली आहे. प्रत्येक अन्यायाचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. आजच्या पुरतं चोरलेलं धनुष्य कागदावरचं आहे. पण एक धनुष्यबाण माझ्याकडे आहे आणि कायम राहणार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीशिवसेना