उरण : उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण रेल्वेमार्ग पाच वर्षांनी प्रवासी वाहतुकीसाठी १२ जानेवारी रोजी खुला होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे. या मार्गावरील प्रवासी वाहतूक करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. सिडको, मध्य रेल्वे यांच्या भागीदारीत २७ कि.मी. लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाचा नेरूळ-उरण महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ कि.मी. लांबीच्या या रेल्वेमार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरूळ, सीवूड, सागरसंगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ कि.मी. अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.
१४.३ किलाेमीटर लांबीचा मार्ग :
उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण या स्टेशनांदरम्यान १४.३ किलाे मीटर लांबीच्या रेल्वेमार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले असून रेल्वेमार्ग आता प्रवासी वाहतुकीसाठी तयार झाल्याने सर्वांची उत्सुकता वाढली आहे.
या मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ दिवसांपासून तपासणीच्या कामाची सुरुवात केली आहे.
स्थानकाची रंगरंगोटी, साफसफाई केली जात आहे. गुरुवारी उरण स्थानकावर रेल्वेच्या स्वागतासाठी मंडप, आसनव्यवस्था आणि सुशोभीकरणाचे काम सुरू होते. साडेबाराच्या सुमारास १२ डब्यांच्या गाडीचे स्थानकात आगमन होणार असून पंतप्रधान गाडीला हिरवा झेंडा दाखवून या मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे उद्घाटन आणि प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत.