मुंबई : मुंबईचा भूमिपूत्र असलेला कोळी समाज अद्यापही अनेक सुविधांपासून वंचित आहे.कोळी समाजाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मत्स्य संपदा योजना आणली. मात्र कोळी समाजाला अजूनही या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा कोळी समाजाला लवकर लाभ मिळावा अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी संबधीत मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांसमोर नुकतीच मढ मध्ये केली.
खासदार गोपाल शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली किल्लेश्वर मंदिराजवळील मढ ऐरफोर्स स्टेशन लगतच्या जागे संबंधी चर्चा करण्यासाठी पातवाडी कोळीवाडा ग्रामस्थ मंडळातर्फे ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टी यांनी कोळी बांधव , मत्स्य व्यवसायाला शासनाकडून मिळणारे लाभ या संबंधी चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेने, रिझर्व्ह बेंकेच्या सूचनेनुसार मच्छीमारांना किसन क्रेडिट कार्ड वाटप बाबत त्वरित कार्यवाही करणे, स्कॅल ऑफ फायनान्स बाबत उत्तर मुंबई जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर बैठक आयोजित करून एका आठवड्यात त्वरित कार्यवाही करणे, राज्य शासनाकडून मच्छीमारांसाठी देय असलेले ६५ कोटी मंजूर केलेले सानुग्रह अनुदानाचे लवकर वाटप करणे , तसेच एक कोटी शित पेटी साठी मंजूर केलेल्या निधीतून मच्छीमारांनालवकर शीतपेटीचे वाटप करावे असे ही निर्देश खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले. या बैठकीत कोळी समाजाचा विचार करून अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
कोळी समाज व मत्स्व्यवसाय करिता केलेल्या प्रयत्नांबद्दल कोळी बांधवांनी खासदार गोपाळ शेट्टी यांचा यावेळी कोळी बांधवांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर प्रभाग क्रमांक 49 च्या स्थानिक नगरसेविका संगीता सुतार यांची पालिकेच्या पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार शेट्टी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला मुंबई उपनगराचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ.समता शितुत, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी संदीप दप्तरदार,परवाना अधिकारी अशोक जावळे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पार्थ तावडे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक दिनेश पाटील, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, मढ मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र आखाडे, मालाड भाजपा अध्यक्ष सुनील कोळी, युनूस खान, जॉन डेनिस, मढ एरफोर्स स्टेशनचे सीईओ दीपक नेरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.