नवी मुंबई : लोकमतच्या निसर्ग सफारी स्पर्धेमुळे पुस्तकात वाचलेले संसद भवन प्रत्यक्षात पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हा अविस्मरणीय अनुभव असल्याचे मत उरणच्या अनुष्का मोहिते या विद्यार्थिनीने व्यक्त केले आहे. या सफारीमुळे आपल्यात आत्मविश्वास जागा झाला असल्याची भावनाही तिने व्यक्त केली आहे. लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाअंतर्गत ‘निसर्ग सफारी’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत उरणच्या अनुष्का मोहिते या विद्यार्थिनीने विजेतेपद पटकावले. त्यानुसार लोकमतने संपूर्ण राज्यातून ३५ विद्यार्थ्यांना हवाई सफर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणली होती. त्यामध्ये अनुष्का हिचाही सहभाग होता. निसर्ग सफारीचा हा अनुभव आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे अनुष्काने सांगितले. तसेच आजपर्यंत केवळ पुस्तकात वाचलेले संसद भवन प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याचा आनंद तिने लोकमतकडे व्यक्त केला. दिल्ली येथे जाण्यासाठी मुंबईतून केलेला विमान प्रवास हा देखील आपल्यासाठी अविस्मरणीय प्रसंग ठरणार आहे. प्रथमच विमानात बसण्याच्या मिळालेल्या संधीने आपल्याला सर्वाधिक आनंद झाल्याची भावनाही तिने व्यक्त केली. अपेक्षा नसतानाही आपल्याला पंतप्रधानांसारख्या मोठ्या व्यक्तीला भेटता आल्याचा आनंदही तिने व्यक्त केला. सर्व विद्यार्थी संसद भवनात गेल्यानंतर तेथे पंतप्रधानांनी आमच्याशी थेट सुसंवाद साधला. त्यांनी आमच्याशी मराठीतच बोलत मुलांना चांगले शिकण्याचा व प्रगती करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्याने आम्ही सर्वच विद्यार्थी खूप भारावून गेलो होतो. या अनुभवामुळे आमच्यात अधिक आत्मविश्वास जागा झाला असल्याचेही अनुष्काने सांगितले. पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिल्ली फिरण्याचीही संधी मिळाली. यावेळी इंडिया गेट, राजघाट ही ठिकाणे पाहता आल्याचा आनंदही तिने व्यक्त केला. अनुष्काच्या कुटुंबीयांनीही तिच्या या यशाचे कौतुक केले आहे. आमची मुलगी लोकमतच्या स्पर्धेत विजेती ठरुन पंतप्रधानांना भेटून आली याचे सर्वांनाच कौतुक वाटत आहे. त्यामुळे सर्वजण तिच्या अनुभवाची कौतुकाने विचारपूस करीत असल्याचा आनंदही मिळत असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांची भेट अविस्मरणीय
By admin | Published: July 17, 2014 1:52 AM