मुंबईतील 77 वर्ष जुने हॉस्पिटल काही काळासाठी बंद, प्रशासनाचे 900 कामगारांना आश्वासन
By संतोष आंधळे | Published: August 28, 2022 06:36 PM2022-08-28T18:36:50+5:302022-08-28T18:51:39+5:30
प्रिन्स अली खान रुग्णालयाच्या कामगारपुढे भवितव्याचा पेच
मुंबई : भायखळा येथील ७७ वर्ष जुने प्रिन्स अली खान हॉस्पिटल या मुख्य इमारतीच्या डागडुजी करण्याकरिता काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. मात्र तेथे काम करणाऱ्या ९०० कामगारांचे पुढे काय होणार याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर शनिवारी रुग्णालय प्रशासनाने कामगाराची भेट घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या आठवड्यात प्रिन्स अली खान हॉस्पिटल प्रशासनाने अचानक हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेतला. तर रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या दुसऱ्या इमारतीत केवळ बाह्य रुग्ण विभाग ( ओ पी डी ) सेवा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र उपचाराकरिता कोणत्याही रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही, तसेच सर्व शस्त्रक्रिया काही काळाकरिता बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या रुग्णालय इमारतीचे प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले होते. त्या ऑडिट मध्ये काही गंभीर नोंदी करण्यात आल्या असून ही इमारत धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, रुग्णालयात काम करणाऱ्या कमगारांना याबाबत कुठलीही स्पष्टता देण्यात आली नव्हती. त्यांनी हॉस्पिटल बंद केल्यावर काय करायचे ? त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. अखेर सहा दिवसाने रुग्णालयात प्रशासन आणि कामगारांमध्ये भेट घडली.
प्रिन्स अली कामगार संघटनेचे सुहास पाठारे सांगतात, " कुणी असे स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आल्यानंतर असे तात्काळ कुणी रुग्णालय बंद करतात का ? महापालिकेने नोटीस द्यावी लागते. ते येथे काहीच झालेले नाही. आम्ही रोज कामगार रुग्णालयाच्या खाली येऊन बसत होतो. अखेर रुग्णालय प्रशासन आणि आमच्यात शनिवारी चर्चा झाली त्यात त्यांनी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. अजूनही ठोस असे काही उत्तर मिळालेले नाही. सोमवारी रुग्णालय प्रशासनाची पुन्हा एकदा बैठक होणार आहे, त्यातून काही निर्णय होतो का ते कळेल."
रुग्णालय प्रशासनाकडून यावर पत्रक काढण्यात आले आहे. त्यामध्ये रुग्णालयाचे अध्यक्ष अमीन मनेकिया यांनी कामगारांशी संवाद साधून सध्या सुरु असलेल्या या प्रकणात योग्य तो तोडगा काढला जाईल असे सांगितले. तसेच रुग्णालयाचे दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करून नंतरच निर्णय घेण्यात येईल. तसेच गणेशोउत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात पगार लवकर देण्यात असे आश्वासन दिले आहे.