Join us

मुख्य इमारतीच्या डागडुजीसाठी प्रिन्स अली खान हॉस्पिटल काही काळासाठी बंद

By संतोष आंधळे | Published: August 22, 2022 4:00 PM

या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध होते. विशेष करून कर्करोगाच्या उपचाकरीता अनेक रुग्ण या रुग्णालयात येत होते.

संतोष आंधळे 

मुंबई : भायखळा येथील ७७ वर्ष जुने प्रिन्स अली खान हॉस्पिटल या मुख्य इमारतीच्या डागडुजी करण्याकरिता काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या दुसऱ्या इमारतीती केवळ बाह्य रुग्ण विभाग ( ओ पी डी ) सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र उपचाराकरिता कोणत्याही रुग्णांना दाखल करण्यात येणार नाही, तसेच सर्व शस्त्रक्रिया काही काळाकरिता बंद ठेवण्यात आल्या आहे.

या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध होते. विशेष करून कर्करोगाच्या उपचाकरीता अनेक रुग्ण या रुग्णालयात येत होते. रुग्णालयाची इमारत जुनी असली तरी अधून मधून त्याचे काम केले जात होते. मात्र जीर्ण झालेल्या या इमारतीचे रुग्णालय प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. त्या ऑडिट मध्ये काही गंभीर नोंदी करण्यात आल्या असून ही इमारत धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  

रुग्णालय प्रशासनातिला वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली, " १९ ऑगस्ट रोजी  स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आला. त्यातील गंभीर बाबी निदर्शनास आल्या नंतर २० ऑगस्टला हॉस्पिटल काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दलची सर्व माहिती डॉक्टर आणि रुग्णांना देण्यात आली आहे. रुग्णालयात आजच्या घडीला २०-२५ रुग्ण आहेत त्यांना आज इतरत्र नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. अजून एक  स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन त्याचा अहवाल आणि आधीच अहवाल याची पडताळणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल. रुग्णालय किती काळाकरिता  बंद राहील हे आताच सांगता येणार नाही."  

या रुग्णालयात एकूण १६० बेड्स असून भायखळा परिसरातील जुने खासगी रुग्णालय असून गरिबांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात होते. डॉ सुलतान प्रधान आणि डॉ गुस्ताद डावर यांच्यासारखी नावाजलेले डॉक्टर या रुग्णालयातून रुग्णांना सेवा देत होते.

टॅग्स :हॉस्पिटल