Join us

‘प्रिन्स’चा डावा हात काढला, चार महिन्यांच्या बाळावर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:44 AM

ईसीजी यंत्रणेत बिघाड होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये जखमी झालेल्या चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर या बाळावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबई : केईएम रुग्णालयाच्या बालअतिदक्षता विभागात ईसीजी यंत्रणेत बिघाड होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये जखमी झालेल्या चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर या बाळावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत प्रिन्सचा डावा हात काढण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. भाजल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.प्रिन्सला प्रतिजैविकांचा डोस देण्यात येत असून बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागामध्ये परत आणण्यात येणार आहे. वाराणसीहून हृदयाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी केईएमच्या अतिदक्षता विभागात प्रिन्स दाखल झाला होता. मात्र ईसीजी यंत्रणेतील बिघाडामुळे येथे झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये तो १५-२० टक्के भाजला होता. ईसीजी यंत्रणेतील वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्यामुळे गादीला आग लागली आणि परिणामी प्रिन्सच्या डोक्याचा काही भाग आणि डावा हात भाजला होता.>‘चौकशी समिती नियुक्त’या प्रकरणी पालिका प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. याविषयी पत्र मिळाल्यानंतर तपासाची प्रक्रिया सुरू होईल असे पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक व समिती सदस्य डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये रुग्णांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कुठलीही तरतूद नसल्याचे स्पष्ट करत याविषयी अद्याप निर्णय झाला नसल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले.