मुंबई : केईएम रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या बाळाला १० लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनमध्ये अडकून मरण पावलेल्या राजेश मारू या तरुणाच्या कुटुंबालाही आर्थिक मदत देण्यावर शिक्कामोर्तब झाले. महापौर दालनात आयोजित सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय बुधवारी घेण्यात आला.पालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर हा चार महिन्यांचा मुलगा उपचारासाठी दाखल होता. त्याच्या हृदयाला छिद्र असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. ७ नोव्हेंबर रोजी या रुग्णालयातील ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत प्रिन्सला हात गमवावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. पालिका रुग्णालयात ही दुर्घटना घडल्याने त्याला आर्थिक मदत देण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. मात्र पालिका प्रशासनाने पाठवलेला पाच लाखांचा धनादेश राजभर कुटुंबाने नाकारला.महापौर दालनात बोलाविलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. प्रिन्सच्या उदरनिर्वाहासाठी १० लाखांची मदत करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या प्रस्तावावर आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही शिक्कामोर्तब केले. त्यानुसार पाच लाखांचा पहिला धनादेश देण्यात येईल. तर पाच लाख रुपये प्रिन्सच्या नावाने बँकेत ठेवण्यात येतील, जेणेकरून त्यावरील व्याजात प्रिन्सला उदरनिर्वाह करता येईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.मारू कुटुंबीयांनाही मदतजानेवारी २०१८ मध्ये नायर रुग्णालयात आपल्या बहिणीच्या सासूला बघण्यासाठी आलेला राजेश मारू हा तरुण एमआरआय मशीनमध्ये खेचला गेला. या दुर्घटनेतच त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात होती. परंतु, हे प्रकरण न्यायालयात गेले. या घटनेच्या दोन वर्षांनंतरही मारू कुटुंबीयांना मदत मिळालेली नाही. न्यायालयात वकिलांवर पैसे खर्च करण्यापेक्षा मारू कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्याची सूचना गटनेत्यांनी केली. ही मागणी आयुक्तांनी मान्य केली असल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सांगितले.पालिका रुग्णालयात स्वस्त औषधएम्सच्या धर्तीवर पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयातील औषधांच्या दुकानांमध्ये ४० टक्के कमी दरांमध्ये औषधे देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. ‘अमृत औषध योजनें’तर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरजू आणि गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.नुकसानभरपाईचे धोरणझाड पडून जखमी, मॅनहोलमध्ये पडणे, खड्ड्यात पडणे अशा दुर्घटनांमध्ये जखमी अथवा मृतांच्या नातेवाइकांना मदत मिळण्याची मागणी वारंवार केली जाते. मात्र अद्याप अशी मदत देण्याचे धोरण महापालिकेत नसल्याने पीडित मदतीपासून वंचित राहत होते. परंतु, यासाठी ठोस धोरण आखण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या धोरणाचा मसुदा चार दिवसांमध्ये सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.
अखेर प्रिन्सला मिळणार दहा लाखांची मदत; गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 2:58 AM