प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचा अहवाल गृह मंत्रालयात सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:31 AM2020-04-28T05:31:16+5:302020-04-28T05:31:22+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील, त्यानंतर मुखमंत्र्यांकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले
जमीर काझी
मुंबई : येस बँकेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या वाधवान बंधूंना लॉकडाउनच्या काळात आपल्या लेटरहेडवर फिरण्यासाठी शिफारस पत्र देणाऱ्या गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचावरील चौकशी अहवाल सोमवारी गृह विभागात सादर करण्यात आला. गुप्ता यांनी या प्रकरणात अधिकाराचा गैरवापर केला असून त्यांना सक्त ताकीद द्यावी अशी शिफारस करण्यात आल्याचे समजते. गृहमंत्री अनिल देशमुख याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील, त्यानंतर मुखमंत्र्यांकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी या प्रकरणाची चौकशी केली. येस बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या आणि सीबीआयचे वॉन्टेड आरोपी असलेले वाधवान बंधू यांना गुप्ता यांनी आपल्या अधिकारात नसतानाही त्यांचा कौटुंबिक मित्र म्हणून पत्रात उल्लेख केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून १५ दिवसांत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले होते.
चौकशीदरम्यान अमिताभ गुप्ता यांनी आपण हे पत्र स्वत: च्या अधिकारात मानवतेच्या आधारावर दिले. त्यासाठी कोणाचाही दबाव आपल्यावर नसल्याची कबुली त्यांनी दिली आहे. आपल्याकडून अनवधानाने परवानगी देण्याची ही चूक झाल्याचे सांगत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार त्यांच्याबद्दल कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
>गुप्ता एसीआरमध्ये सर्वोकृष्ट
गुप्ता हे १९९२च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून आतापर्यंतच्या त्यांच्या २८ वर्षांच्या सेवेत गोपनीय अहवाल (एसीआर) सर्वोकृष्ट आहेत. यापूर्वी त्यांच्याबाबत एकाही प्रकरणात गंभीर तक्रार आलेली नाही, तसेच कसलीही चौकशी झालेली नाही. या त्यांच्या जमेच्या बाजू असून अखिल भारतीय केंद्रीय सेवा अधिनियमातील तरतुदींचा विचार करून त्यांना सक्त ताकीद द्यावी, असे अहवालात सुचविण्यात आल्याचे समजते.
>वाधवान बंधूंना
४ मेपर्यंत कोठडी
मुंबई : येस बँकेच्या हजारो कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी डीएचएलएफचे प्रमोटर्स कपिल वाधवान, भाऊ धीरज वाधवान यांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाची (सीबीआय) चार मे पर्यंत कोठडी मिळाली.
वाधवान बंधूना सीबीआयने रविवारी सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले. येस बँकेच्या ३७००० कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांच्या परदेशातील बँक खात्यावर ६०० कोटींची लाच दिल्याचे स्पष्ट झाले. सीबीआयने ७ मार्चला गुन्हा दाखल केला. १७ मार्चला अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाचे कारण सांगत त्यांनी हजर होणे टाळले होते.