रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हमास या पॅलेस्टाईनवादी संघटनेच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवरील काही पोस्टना लाईक केल्याबद्दल विद्याविहार येथील दि सोमय्या स्कुलच्या प्राचार्य परवीन शेख यांची सेवा व्यवस्थापनाकडून समाप्त करण्यात आली. प्राचार्यांच्या लेखी खुलाशानंतर हा निर्णय घेण्यात आला. शेख यांनी केलेल्या पोस्टविषयी एका ऑनलाईन पोर्टलवर २४ एप्रिलला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांच्याकडून आपल्या कृतीचा लेखी खुलासा मागितला होता. त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी लेखी विचारणा करणारी नोटीस व्यवस्थापनाने शेख यांना पाठविली आहे.
इस्रायलमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या हमास या संघटनेविषयी शेख यांना सहानभुती आहे, तसेच त्या हिंदूविरोधी आहेत, इस्लामवादी उमर खलिदविषयी सहानुभूती बाळगत आहेत, असा आक्षेप संबंधित ऑनलाईन पोर्टलमधील लिखाणात घेण्यात आला होता. त्यांनी गेल्या काही दिवसांत एक्स या समाजमाध्यमावर लाईक केलेल्या पोस्टच्या आधारे हा आक्षेप घेण्यात आला होता. संस्थेच्या एकता आणि सर्वसमावेशकता तत्वाला बाधा पोहोचू नये म्हणून शेख यांनी सेवा समाप्त करण्यात येत आहे, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. तर संस्थेच्या या निर्णयाबाबत आपण कायदेशीर बाबी तपासत आहोत, असे शेख यांनी म्हटले आहे. आपल्याला ही बाब सोशल मीडियावर समजली. त्याने आपल्याला धक्का बसला. माझे निलंबन पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे त्यांनी म्हटले आहे.