हिंदू-मुस्लीम भाई-भाईची प्रचिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 02:24 AM2018-09-10T02:24:06+5:302018-09-10T02:24:09+5:30
गणेशोत्सव तोंडावर आलेला असल्याने गणेशमूर्ती मंडळांमध्ये आणण्याची लगबग सुरू झाली आहे.
- खलील गिरकर
मुंबई : गणेशोत्सव तोंडावर आलेला असल्याने गणेशमूर्ती मंडळांमध्ये आणण्याची लगबग सुरू झाली आहे. मुंबईतील गणेशोत्सवामध्ये हिंदू धर्मीयांसोबत मुस्लीम नागरिकांचा मोठा सहभाग आयोजनासोबत विसर्जन मिरवणुकीपर्यंत असतो. लालबागचा राजासहित दक्षिण मुंबईतील विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक मुस्लीमबहुल वस्त्यांमधून जाते. या वेळी या उत्सवामध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी मुस्लीम नागरिक मोठ्या उत्साहात पुढाकार घेतात. यंदादेखील त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
लालबाग, परळ, भायखळा परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचा प्रवास भायखळा येथील क्लेअर रोड ते दोन टाकी परिसरातून होतो. हा भाग पूर्णत: मुस्लीमबहुल म्हणून ओळखला जातो. या भागातून मिरवणूक जाताना पोलीस यंत्रणेवर खरे पाहता मोठा ताण असायला हवा, मात्र प्रत्यक्षात या भागातील मुस्लीम नागरिक मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी पुढे येत असल्याने पोलीस निश्चिंत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून नागपाडा सिग्नलजवळ उंच व्यासपीठ बनवून या भागातून जाणाऱ्या सर्व गणेशमूर्तींचे स्वागत केले जाते व मिरवणुकीत सहभागी असलेल्या गणेशभक्तांना सरबत, बिस्किटे यांचे वाटप केले जाते.
या भागातील मुस्लीम स्वयंसेवी संस्था, नागपाडा पोलिसांची मोहल्ला समिती यांच्या माध्यमातून मिरवणूक जाण्यापूर्वी आवश्यक ती कामे केली जातात.
अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू असून हिंदू व मुस्लीम दोन्ही समाजांच्या नागरिकांमध्ये बंधुभाव वाढावा व एकमेकांच्या धर्मांचा, उत्सवांचा आदर करावा यासाठी येथून जाणाºया मिरवणुकींचे स्थानिक मुस्लीम बांधव स्वागत करतात, अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सर्फराज आरजू यांनी दिली. या भागातून जाताना कोणतीही अडचण उद्भवू नये याची काळजी आम्ही सर्व घेतो, असे ते म्हणाले.
नागपाडा मोहल्ला समितीचे व सद्भावना असोसिएशनचे सदस्य ताज कुरैशी म्हणाले, विसर्जनाच्या एक दिवस अगोदर आम्ही वाहतूक पोलिसांच्या सोबत या मार्गावर फिरून रस्त्यावर पार्क केलेली वाहने काढण्यास सांगतो. मिरवणूक जाताना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आम्ही डोळ्यात तेल घालून दक्ष असतो. मिरवणूक येते तेव्हा आमच्यातर्फे त्यांचे स्वागत केले जाते. े मुस्लीम स्वयंसेवक सहभागी होऊन भाई भाई असल्याचे दाखवून देतो़