मुंबई : सायन कोळीवाडा येथील म्हाडाच्या एका इमारतीच्या गच्चीवर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळत असलेल्या ७५ जणांना अटक केली. त्यांच्याकडे तब्बल एक लाख ६१ हजारांची रोकड व ७२ मोबाइल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडून पळापळ झाली. गेल्या काही महिन्यांतील महानगरातील ही मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. म्हाडाच्या सहा नंबर इमारतीच्या गच्चीवर गेल्या काही दिवसांपासून रोज रात्री जुगार क्लब चालविला जात असल्याची माहिती समाजसेवा शाखा पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुहेश गौरड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकला. त्या वेळी टेरेसवर टेबल व खुर्च्या मांडून मोठ्या संख्येने जमलेले नागरिक तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलीस असल्याचे समजल्याने अनेक जण दरवाजाच्या दिशेने पळत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. क्लबचालक सलीम शेखसह एकूण ७५ जणांना पकडले. त्यांच्याकडे १ लाख ६१ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे ७२ मोबाइल, तेथील टेबल, खुर्च्या व अन्य साहित्य जप्त केले. सर्वांना सकाळी साडेअकराच्या सुमारास भोईवाडा येथील न्यायदंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर सुटका झाली. (प्रतिनिधी)
गच्चीवरील जुगार क्लबवर छापा
By admin | Published: October 23, 2015 3:20 AM