बदलापूर : बदलापूरमध्ये अल्प कालावधीतच नावारूपाला आलेल्या सक्सेस ढाब्याच्या यशाचे रहस्य गुन्हे शाखेने उघड केले आहे. या ढाब्यावर उघडपणे हुक्का पार्लर सुरू होते. त्यामुळे या ढाब्यावर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली. परिणामी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे निद्रावस्थेत होते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
या ढाब्याच्या ठिकाणी नेहमीच तरुणाई आलेली असते. यासंदर्भातील अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. मात्र स्थानिक पोलीस या तक्रारींकडे दुर्लक्ष करत होते. जी काही कारवाई केली तीही दिखाव्यासाठीच. मात्र रात्रीची संचारबंदी लागू केल्यावर या ठिकाणी हुक्का पार्लर बंद राहील अशी अपेक्षा होती. मात्र शहरातील सर्व हॉटेल आणि ढाबे बंद झाल्यावरही सक्सेस धाबा हा शटर बंद करून आतमध्ये ग्राहकांना हुक्का पुरवित होता. अखेर ढाबा बंद करण्यासाठी उल्हासनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली.
भिवंडीत हुक्का पार्लरवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडीच्या गुन्हे शाखेच्या पथकाने खाडीपार परिसरात जॉय हुक्का पार्लरवर शुक्रवारी रात्री छापा टाकून २५ तरुणांना ताब्यात घेतले. भिवंडीत मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. त्यामुळे खाडीपार भागात कॅफेच्या नावाखाली जॉय हुक्का सुरू असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच रात्रीच्या सुमारास छापा टाकला. त्या वेळी २५ तरुण हुक्क्याच्या नशेमध्ये धुंद असल्याचे दिसले. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री या ढाब्यावर छापा टाकला. यामध्ये सचिन कदम, नितीन गवणे, समीर पाष्टे, विकास जाधव, रवींद्र कापडणे, विशाल टोणपे, सुजीत पवार, प्रफुल राव, प्रवीण गवळी, अनिकेत जाधव, जय कनोजे, अजिंक्य गायकवाड, हर्षद शिंगरे या २५ ते ३८ वयोगटातील तरुणांना अटक केली. ढाब्याच्या मालकावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.