मुंबई : कोरोनामुळे मुद्रकांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी मालाचे दर वाढवले आहेत. त्यामुळे मुद्रक आणखी अडचणीत सापडले आहेत. ८५ टक्के लहान-मोठे मुद्रक कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे त्रासले आहेत. त्यांना आपला व्यवसाय सुरु ठेवणेदेखील यामुळे कठीण झाले आहे, असे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे अध्यक्ष कमलजी चोप्रा यांनी प्रत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, लॉकडाऊननंतर मुद्रकांनी हळूहळू व्यवसाय सुरु करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती बिकट असतानासुद्धा व्यवसाय सुरु ठेवायचे आव्हान मुद्रकांनी आपल्या क्षमतेनुसार स्वीकारले. परंतु, वाढत्या किमतीमुळे मुद्रकांना व्यवसायासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कायद्यानुसार पेपर, पेपर बोर्ड, न्यूज प्रिंट या गोष्टी महत्त्वाच्या अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्याचा विचार करून केंद्र सरकारने मुद्रण व्यावसायिकांना सहकार्य करावे.
तर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे सरचिटणीस जी. एन. विश्वकुमार म्हणाले की, गेल्या पाच ते सहा महिन्यांत पेपर मिलवाले दरात सातत्याने वाढ करत आहेत. मात्र, ग्राहक मुद्रकांना दर वाढवून देण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुद्रकांचे नुकसान होत आहे. याबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे ते म्हणाले.