पालघरच्या चाैघांना अटक : ३५ लाख रुपयांसह प्रिंटर, स्कॅनर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बनावट नोटाप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत घरातूनच बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती समोर आली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली असून याप्रकरणी पालघरच्या चौघांना अटक केली.
अब्दुला कल्लू खान (२४), महेंद्र तुकाराम खांडसकर (५०), फारुख पाशा चौधरी (३३), आणि अमीन उस्मान शेख (४१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३५ लाख ५४ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
विक्रोळी पूर्वेकडील प्रवीण हॉटेल परिसरात दोन तरुण बनावट नोटांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सापळा रचून अटक करण्यात आली. अटक आरोपींच्या चौकशीतून पालघरच्या वाडा येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांनी या नोटा घरातच बनवल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्या घरी छापा टाकून प्रिंटर, स्कॅनर, पेपर तसेच एकूण ३५ लाख ५४ हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
अटक आराेपींना बुधवारी न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांनी या पैशांचा वापर कुठे कुठे केला? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
.............................................