युट्यूबवरून घेतले प्रशिक्षण, चार लाखांच्या बनावट नोटा जप्त
कर्जबाजारी झाला म्हणून घरातूनच सुरू केली बनावट नोटांची छपाई
यु ट्यूबवरून घेतले प्रशिक्षण; चार लाखांच्या बनावट नोटा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जबाजारी झाला म्हणून ३५ वर्षीय तरुणाने चेंबूरमध्ये घरातूनच बनावट नोटांची छपाई सुरू केल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत उघड झाला आहे. याप्रकरणी मोहम्मद फकियान अयुब खान (३५) याला पोलिसांनी अटक केली. त्याने यू ट्यूबवरून याचे प्रशिक्षण घेतले होते.
गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने ही कारवाई केली. चेंबूर परिसरात मंगळवारी एक जण बनावट नोटा वाटण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्या अंगझडतीत ५५ हजार ४५० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. त्याने चेंबूर येथील एमएमआरडीए वसाहतीत भाड्याने खोली घेतली हाेती. तेथेच यु ट्यूबवर पाहून त्याने बनावट नोटांची छपाई सुरू केली होती. त्याच्या घरातूनही लाखोंच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच कलर प्रिंटर, हिरव्या रंगाचे पेपर रोल, पारदर्शक डिंक, वेगवेगळ्या रंगाचे पेन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.
नोकरी सुटल्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला हाेता. यातूनच झटपट पैसा कमाविण्यासाठी त्याने अशाप्रकारे बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचे त्याच्या चाैकशीतून समाेर आले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
....................