Join us

बारावीच्या बुक किपिंग अ‍ॅण्ड अकाउंटसीच्या पेपरमध्ये छपाईची चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:23 AM

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून बुधवारी वाणिज्य शाखेच्या बीकेचा म्हणजेच बुक किपिंग आणि अकाउंटसीचा पेपर होता.

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून बुधवारी वाणिज्य शाखेच्या बीकेचा म्हणजेच बुक किपिंग आणि अकाउंटसीचा पेपर होता. मात्र, या प्रश्नपत्रिकांमध्ये छपाईच्या अनेक चुका होत्या. या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक ३ च्या बॅलेन्स शीटमध्ये दाखविण्यात आलेल्या फर्निचरची किंमत काही प्रश्नपत्रिकांमध्ये ६ हजार रुपये अशी छापण्यात आली होती. प्रत्यक्षात ती ७६ हजार अशी असल्याचे पेपरनंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली. यासंदर्भात बोर्डाकडून किंवा पर्यवेक्षकांकडूनदेखील कोणत्याही सूचना न मिळाल्याने गुण वाया जातील, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या प्रश्नपत्रिका सध्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप्सवर व्हायरल होत आहेत.यासंदर्भात मुंबई शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव शरद यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप तरी मंडळाकडे तक्रार आलेली नाही. असे काही आढळल्यास किंवा तक्रारी आल्यास मुख्य नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान, बारावीच्या बुधवारी असलेल्या वाणिज्य शाखेच्या बुक किपिंग आणि अकाउंटसीच्या तसेच विज्ञान शाखेच्या जीवशास्त्र पेपरला मुंबई विभागातून २ कॉपीची प्रकरणे उघडकीस आल्याचे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने सांगितले.